जगभरात करोना आजाराने थैमान घातले असून, या आजाराला कोव्हिड-१९ म्हणून देखील बोललेले जाते. या आजाराच्या रुग्णांची संख्या जगभरात वाढत आहे. तर भारतातही या आजाराने हळूहळू पाय रोवण्यास सुरुवात केली. करोना व्हायरस या आजारावर सोशल मीडियावर भन्नाट असे जोक व्हायरल होत आहेत. त्यात पुणे मागे कसं राहणार? पुण्यातील खराडी भागातील गेरा सोसायटीमधील ८ मुलांनी एकत्रित येत थेट करोनावर गाणंच लिहिलं. ‘तुमने ना जाना, ना हम ने जाना,’ असे या गाण्याचे बोल आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या गाण्याला चालही दिली आहे.

या गाण्याची जेथून सुरुवात झाली, त्या वैशाली बक्षी यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, ‘मी आणि माझा मुलगा नेहमी गाण्यामध्ये बोलत असतो. मागील महिन्याभरापासून करोना या आजाराने थैमान घातल्याच्या चर्चा ऐकण्यास मिळत आहे. तशी आमच्या घरात देखील होती. तेव्हा माझा मुलगा तुमने ना जाना, ना हम ने ना जाना, हे गाण गात गायचा. तेवढ्यात त्याच्या मनात आलं की, आपण करोना व्हायरसवर एखादी गाण्याची चाल घेऊन गाण करूया. मग आमचं ठरलं. त्यानुसार दोन दिवसात गाणं तयार केलं. त्यानंतर आमच्या सोसायटीमधील मुले एकत्र करून, करोना व्हायरस आजारावर गाण तयार केलं. हे गाण तयार करताना अनेक अनुभव आले. मात्र आज वेगळ समाधान लाभत असून प्रत्येकाने काळजी घ्या, पण घाबरून जाऊ नका,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

या गाण्याविषयी बोलताना तेजस बक्षी म्हणाला की, ‘माझी आणि आईची करोना व्हायरस या आजारावर अनेक वेळा चर्चा झाल्यावर हे गाण तयार केलं आहे. त्यानंतर आमच्या सर्वांमधील गैरसमज दूर झाला.  नागरिकांनी देखील घाबरुन जाऊ नये. प्रत्येकानं आपली काळजी घ्यावी. घरात स्वच्छता बाळगावी,’ असं आवाहन करण्यासही इयत्ता सातवीत शिकणारा तेजस सांगण्याला विसरला नाही.

विधी लाड म्हणाली, ‘सध्याच युग हे सोशल मीडियाचं आहे. यामाध्यमातून करोना व्हायरसबाबत जनजागृती करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. अशा प्रकारचं आम्ही पहिल्यांदा गाण तयार केलं असून, याचा अनुभव खूप छान होता. तसेच आमचं यू ट्यूब चॅनेल आहे. त्यामध्ये आम्ही सतत विविध गाणी पोस्ट करीत असतो असंही तिनं सांगितलं.

यांनी गायलं गाण : तेजस बक्षी,  विधी लाड, सानिध्या सिंह, साध्या सिंह, सिद्धांत लाडे, आदी सक्सेना , अथर्व शेणवी,स्वरा शेणवी,मिराज गर्ग, अक्षय रामनाथन यांनी हे गाण गायलं आहे.