भक्ती बिसुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान बदलाचे सर्वाधिक दुष्परिणाम लहान मुलांवर होतात, असा निष्कर्ष ‘द लॅन्सेट’ या जागतिक प्रतिष्ठेच्या वैद्यकीय नियतकालिकाच्या  अहवालात काढण्यात आला आहे.

हवामान बदल आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून त्यातील निष्कर्ष धोक्याचा इशारा देणारे आहेत. ‘द २०१९ रिपोर्ट ऑफ द लॅन्सेट काऊंटडाऊन ऑन हेल्थ अ‍ॅण्ड क्लायमेट चेंज’ या अहवालातून जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदलांमुळे होणाऱ्या आर्थिक, शारीरिक आणि सामाजिक दुष्परिणामांचा आढावा घेण्यात आला आहे.

आजच्या बालकांना औद्योगिक क्रांतीपूर्वी जन्माला आलेल्या बालकांच्या तुलनेत चार अंश सेल्सिअस अधिक तापमानाचा सामना करावा लागत आहे. १९६० पासून प्रमुख पिकांचे उत्पन्न घटल्यामुळे त्याचा दुष्परिणाम बालकांच्या पोषणावर झाला. जागतिक स्तरावर लहान मुलांमध्ये अतिसारसदृश आजार तसेच डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे, अशी निरीक्षणेही या अहवालात नोंदवण्यात आली आहेत. हवामान बदल संसर्गजन्य आजारांस कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंच्या फैलावासाठी पोषक ठरत असून ही बाब चिंताजनक आहे. डेंग्यू संसर्गाच्या नोंदी पाहिल्या असता २००० पासून दहापैकी नऊ वर्षे विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरली, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अतिसारसदृश आजार आणि विब्रियो जिवाणूमुळे होणाऱ्या आजारांच्या फैलावांसाठी २०१८ हे वर्ष गेल्या दहा वर्षांतील दुसरा सर्वाधिक पोषक कालखंड ठरल्याचे या अहवालात म्हटले आहे. अतिसार, कुपोषण आणि मलेरियामुळे उद्भवणारा मृत्युदर घटला असला, तरी डेंग्यूमुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या चिंतेची बाब असल्याचे ‘लॅन्सेट’ने अहवालात स्पष्ट केले आहे.

वणव्यांचा सामना : जागतिक तापमानवाढ या विषयाचे गांभीर्य ‘लॅन्सेट काऊंटडाऊन’मध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. जगाच्या नकाशावर ७७ टक्के देशांना सातत्याने वणव्यांचा सामना करावा लागत आहे. सन २००१ ते २०१४ आणि २०१५ ते २०१८ या कालावधीत भारत आणि चीनमध्ये अनुक्रमे १७ आणि २१ दशलक्ष जनतेने वणव्याचे दुष्परिणाम सोसल्याचे ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे. जागतिक तापमानवाढ मजुरांची कार्यक्षमता कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climate change threatens childrens health abn
First published on: 25-11-2019 at 00:48 IST