लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कल्याणीनगर येथील आलिशान चारचाकी अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना मद्य पुरविणे, वेळेची मर्यादा न पाळणे यामुळे शहरातील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वूड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल, परमिट रूम, तसेच पब बंदची कारवाई जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी केली. पुढील आदेशापर्यंत हे पब बंदच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

कल्याणीनगर येथील अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार कोझी आणि ब्लॅक या दोन्ही पबचालकांवर सोमवारी तातडीने गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही पबमध्ये मद्यविक्रीबाबतच्या नोंदी ठेवण्यात आल्या नव्हत्या. तसेच याबाबतचे अभिलेख अद्ययावत नव्हते. त्यामुळे हे दोन्ही पब बंद करण्याच्या कारवाईचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्याकडे मंगळवारी सादर करण्यात आला. हा प्रस्ताव तातडीने मान्य करत डॉ. दिवसे यांनी हे दोन्ही पब पुढील आदेशापर्यंत बंदचे आदेश प्रसृत केले. त्यानंतर तातडीने या आदेशाची अंमलबजावणी करत पब बंद करण्यात आले.

आणखी वाचा-Pune Porsche Accident: अनिशच्या पालकांचा आरोप “महाराष्ट्र पोलिस आणि रुग्णालय प्रशासानाने आम्हाला..”

याबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे उपअधीक्षक सुजित पाटील म्हणाले, की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पुणे शहरातील सर्व पबसह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही प्रकारच्या मद्याची विक्री करण्यात येऊ नये. रात्री दीडपर्यंतच हॉटेल, परमिट रूमना परवानगी असून, त्यानंतर या ठिकाणी कोणत्याही मद्याची विक्री करण्यात येऊ नये. नोकरनामधारक महिला वेटरमार्फत रात्री साडेनऊनंतर कोणतीही विदेशी मद्याची सेवा देण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई दारूबंदी कायदा १९४९ आणि मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात येतील.

तपासणी मोहीम सुरू राहणार

वेळेची मर्यादा न पाळणे आणि अल्पवयीन मुलांना मद्य पुरविल्या प्रकरणी मंगळवारी दोन पब बंदची कारवाई करण्यात आली. यापुढेही शहर आणि परिसरातील मद्यालये, पब, मद्यविक्री दुकाने यांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक पाटील यांनी दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collectors action against both pubs closed in kalyaninagar accident case pune print news psg 17 mrj
Show comments