पोलीस ठाणे, चौकीत येणाऱ्या नागरिकाची तक्रार नोंदवून घ्या, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिले आहेत खरे, पण अजून तरी त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. साधी मोबाईल हरवल्याची तक्रार द्यायची असेल तरी ती सुखासुखी घेतली जातेच असे नाही. त्यासाठी मोबाईल खरेदी केल्याची पावती, आयएमईआय क्रमांक, मोबाईलचे खोके अशा गोष्टी मागितल्या जातात अन् तक्रार घ्यायचे टाळले जाते. मात्र, तरीही एका ठिकाणी सुखद धक्का बसतो आणि चक्क तक्रार लिहून घेतली जाते.. ही आहे पुण्यातील चौक्या आणि पोलीस ठाण्यांमधील सद्यस्थिती!
नागरिकांची तक्रार तत्काळ दाखल करून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी वेळोवेळी दिले आहेत. त्याला पोलीस ठाणी व चौक्यांच्या पातळीवर किती प्रतिसाद मिळतो, हे पाहण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या टीमने गुरुवारी व शुक्रवारी प्रत्यक्ष अनुभव व माहिती घेतली. त्यात प्रातिनिधिक नऊ पोलीस चौक्या व ठाण्यांमध्ये जाऊन काय अनुभव येतो हे पाहिले. पद्धत साधी होती- पोलीस ठाणे / चौकीत जाऊन मोबाईल चोरीला गेल्याची किंवा हरवल्याचे सांगायचे आणि तक्रार घेण्यास सांगायचे. या वेळी असे दिसले की बहुतांश ठिकाणी पावतीचे, हद्दीचे किंवा आयएमईआय क्रमांकाचे निमित्त करून तक्रार घेण्यास नकार देण्यात आला. काही ठिकाणी मात्र व्यवस्थित सांगण्यात आले आणि एका ठिकाणी तर चक्क तक्रार घेण्यात आली.
तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलिसांकडून आलेले अनुभव असे :
१. कोथरूड पोलीस ठाणे (गुरुवार, २९ मे; दुपारी १.३०)-
मोबाईल हरवल्याची तक्रार घेण्यासाठी तो विकत घेतल्याची पावती किंवा आयएमईआय क्रमांकासाठी त्याचा बॉक्स यांची आवश्यकता आहे, असे सांगण्यात आले. तक्रार घेतली नाही.
२. नेहरू स्टेडियम पोलीस चौकी (गुरुवार, २९ मे; दुपारी २.००)-
या ठिकाणी आयएमईआय क्रमांकाचे महत्त्व समजावून सांगितले. ‘तक्रार तर आत्तासुद्धा घेऊ शकतो, पण त्याचा उपयोग काय? त्या क्रमांकावरून मोबाईल शोधता येईल. त्यामुळे ती पावती घेऊन या,’ असे सांगितले. तक्रार घेतली नाही.
३. दत्तवाडी पोलीस चौकी (गुरुवार, २९ मे; दुपारी २.१५)-
मोटारसायकलवरून जात असताना मोबाईल हरवल्याचे सांगितले, तेव्हा पोलिसांनी, कुठून कुठे चालला होतात, असे विचारले. मोबाईल गहाळ झाल्याचे सिंहगड रोड पेट्रोल पंपाजवळ लक्षात आले, असे सांगितल्यावर तिथे जाऊन तिथल्या चौकीत तक्रार द्या, असे सांगितले.
४. डेक्कन पोलीस ठाणे (गुरुवार, २९ मे; दुपारी २.३०)-
मोबाईल डेक्कन परिसरात हरवला, असे सांगितले. त्यावर तक्रार देण्यासाठी प्रभात रोड पोलीस चौकीत जाण्यास सांगितले. जाताना सोबत स्वत:चे ओळखपत्र आणि मोबाईल खरेदी केल्याची पावती घेऊन जाण्यास सांगण्यात आले. तक्रार घेतली नाही.
५. लक्ष्मीनगर पोलीस चौकी (शुक्रवार, ३० मे, दुपारी)-
चौकीच्या शेजारच्या गल्लीत सकाळी भाजी आणायला आले असताना मोबाईल फोन दुचाकीच्या पुढच्या उघडय़ा डिकीत राहिला आणि गेला, असे सांगितले. त्यावर पोलिसांनी उत्तर दिले, तुमचा राहण्याचा पत्ता पर्वती पायथा असल्यामुळे नेहरू स्टेडियम पोलिस चौकीत तक्रार द्या. तिथे तक्रार घेतली नाही, तर आम्ही घेऊ. तक्रार देताना मोबाईलची पावती गरजेची आहे. पावती नसेल तर संबंधित सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरकडून या दूरध्वनी क्रमांकाचे सिमकार्ड तुम्हालाच दिले आहे असे लिहून आणा. असे लिहून आणल्यास पावती नसेल तरीही तक्रार घेऊ.
६. फडगेट पोलिस चौकी (शुक्रवार, ३० मे, दुपारी)-
या ठिकाणी ओळखपत्राच्या आधारेसुद्धा तक्रार घेऊ, असे सांगण्यात आले. मामलेदार कचेरीच्या मागील गल्लीत, मोबाईल फोन डिकीत राहिला आणि गेला, असे चौकीत सांगितले. त्यावर पोलिसांचे उत्तर होते की, पावती आणा. पावती नसेल तर ज्या व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड आहे त्याच्या फोटो आयडी कार्डची झेरॉक्स कॉपी आणा; ती जमा करूनही तक्रार घेऊ.
७. प्रभात पोलीस चौकी (शुक्रवार, ३० मे; दुपारी १.३५)-
येथे गेल्यावर साहेब नसल्यामुळे तक्रार घेतली नाही. नंतर दुपारी ३.३० वाजता गेल्यावर मोबाईलची पावती, खोके असल्याशिवाय तक्रार घेतली जाणार नसल्याचे सांगितले. किमान तुम्ही वापरत असलेले सिमकार्ड तुमच्याच नावावर आहे, हे कंपनीच्या कार्यालयातून लिहून आणण्यास सांगितले.
८. एरंडवणा पोलीस चौकी (शुक्रवार, ३० मे, दुपारी ३.०८)-
या एकाच चौकीत लगेचच तक्रार घेण्यात आली.
येथेही मोबाईलचे खोके किंवा पावती आहे का विचारण्यात आले. तसेच, कुठून कसा आणि कुठे हरवला असेल असे विचारले. मात्र, येथे पोलिसांनी तक्रार दिल्याप्रमाणे ती लगेचच लिहून घेतली. त्याची पोहोचही दिली.
९. बालगंधर्व पोलीस चौकी (शुक्रवार, ३० मे; ३.४०)-
येथेही मोबाईलची पावती किंवा खोके असल्याशिवाय तक्रार घेता येणार नाही, असे सांगण्यात आले.
‘तक्रारीसाठी पावती आवश्यक नाही’
मोबाईल हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी त्याची पावती सोबत असणे आवश्यक आहे का? याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तक्रार देण्यासाठी पावतीची आवश्यकता नाही. मात्र, तपासासाठी किंवा मोबाईल मिळाल्यानंतर तो ताब्यात घेण्यासाठी त्याची पावती आणि त्याची आयएमईआय क्रमांकाची आवश्यकता भासते. त्यासाठी पावती गरजेची ठरते. मात्र, तक्रार देण्यासाठी पावती असायलाच पाहिजे असे नाही. 

What happens to your body if you have ajwain tea on an empty stomach
झोपेतून उठताच रिकाम्या पोटी ओव्याचा चहा घेण्याचे फायदे डॉक्टरांनीच सांगितले; फक्त प्रमाण ‘इतकं’ हवं
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार