पुणे : गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेली महिला लोणीकंद पोलीस ठाण्यातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. छकुली राहुल सुकळे (वय २४, रा. वाघोली) असे पसार झालेल्या महिलेचे नाव आहे. वाघोली परिसरात गायरान वस्तीत सुकळे गांजा विक्री करत असल्याची माहिती २५ एप्रिल रोजी लोणीकंद पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी तेथे कारवाई करुन सुकळेला ताब्यात घेतले. तिच्याकडून एक किलो ३२९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. मध्यरात्री कारवाई केल्याने पोलिसांनी तिला नोटीस बजावली. महिलांना रात्री अटक करण्यात येत नसल्याने पोलिसांनी तिला नोटीस बजावली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला अटक करण्यात आली.

हेही वाचा…पिंपरी : नाट्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या वतीने वासुदेव करतोय मतदान जनजागृती

लोणीकंद पोलीस ठाण्यात तिला नेण्यात आले. पोलीस शिपाई तळेकर यांनी तिच्यावर लक्ष ठेवले होते. तिच्या हाताच्या ठसे पोलिसांनी घेतले. अटकेची कारवाई केल्यानंतर पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात थांबविले. कागदपत्रांची पूर्तता करत असताना सुकळे पोलिसांचे लक्ष चुकवून पोलीस ठाण्यातून पसार झाली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Story img Loader