उमेदवार कोण याचाच निर्णय अद्याप होत नसल्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या शांतता असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या मेळाव्यात बुधवारी मोठय़ा संख्यने जमलेल्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना पक्षाच्या नेत्यांनीही काँग्रेसचा उमेदवार कोणीही असो, आपण आघाडीचा धर्म पाळायचा, असे कार्यकर्त्यांना सांगितले.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना व प्रमुख कार्यकर्त्यांना बुधवारी बोलावण्यात आले होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथमच झालेल्या या मेळाव्याला मोठय़ा संख्येने कार्यकर्ते आल्यामुळे पक्षात निवडणुकीचे वातावरण तयार झाल्याचेच दिसून आले. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर चंचला कोद्रे, आमदार बापू पठारे, अनिल भोसले, जयदेव गायकवाड, म्हाडाचे अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, रुक्मिणी चाकणकर यांची यावेळी भाषणे झाली.
काँग्रेसने पुण्यात अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. तरीही हजारी याद्यांवर आपण काम सुरू करावे. काँग्रेसचा उमेदवार कधीही जाहीर झाला आणि तो कोणीही असला, तरी आपण आघाडी धर्म पाळायचा आहे. आघाडीधर्मानुसार पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले. आपण आघाडी म्हणून काँग्रेससाठी काम करणार असलो, तरीही सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राहील याकडेही लक्ष दिले जावे, आघाडीचा धर्म दोघांकडूनही पाळला जाईल याबाबत दक्षता घ्यावी आदी काही सूचनाही यावेळी उपस्थितांनी केल्या.