धान्याची किट वाटप म्हटलं की भल्या मोठ्या रांगा लागत असल्याचं दृश्ये पिंपरी-चिंचवड शहरात बघायला मिळत आहे. दिघी परिसरातही रविवारी अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेचे संतोष तानाजी शेळके यांनी हातावर पोट असलेल्यांसाठी गेल्या वर्षीपासून धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षीही हा उपक्रम त्यांनी अविरतपणे सुरू ठेवला आहे. गेल्या दीड वर्षांपासून करोनाचं संकट घोंगावत असून, यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे बिकट परिस्थितीमध्ये सापडलेल्या कुटुंबातील महिला धान्याची किट घेण्यासाठी रस्त्यावर तासंतास थांबत आहेत.

करोना महामारी सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कित्येकांचे व्यवसाय ठप्प झालेत. अशा परिस्थिमध्ये लाखो नागरिक सापडलेले असून, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थाबरोबरच राजकीय व्यक्तींकडून अडचणीत सापडेल्या नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. अनेक ठिकाणी धान्याची किट वाटली जात असून, ती घेण्यासाठी गरजू आणि आर्थिक संकटात सापडलेल्या महिला रांगेत उभ्या असल्याचं दिसत आहे. पिंपरीतील दिघी परिसरात रविवारी धान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं.

याविषयी धान्याची किट घेण्यासाठी आलेल्या जया राजेंद्र निकराळे म्हणाल्या, “माझे पती रिक्षा चालक आहेत. पण, व्यवसाय ठप्प झाला आहे. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. इथे धान्य वाटप होणार असल्याची माहिती मिळली. त्यामुळे आम्ही धान्य घ्यायला आलो आहोत,” असं त्यांनी सांगितलं. ज्योती नायडू म्हणाल्या, “माझा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. परंतु, लॉकडाऊनमुळे बंधन आली. आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळं धान्याची किट घेण्यासाठी आली आहे. किटमध्ये ३ किलो तांदूळ, ३ किलो गहू, १ किलो साखर, १ किलो गोडेतेल, १ किलो मीठ दिलं जातं. दरम्यान, गरजू व्यक्तींनी सकाळी ११ वाजता दिघी येथील विठ्ठल मंदिर येथे जाऊन नाव नोंदणी केल्यास धान्याची किट मिळणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.