पावसाळ्यात प्राणीपालकांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो, तो प्राण्यांच्या स्वच्छतेचा. या काळात सक्रिय झालेल्या जिवाणू आणि कीटकांचा घरातील मांजर आणि कुत्र्यांना संसर्ग होण्याची भीती असते. त्याशिवाय उबदार वातावरण शोधून मुटकुळे करून झोपलेल्या घरातील श्वान किंवा मांजरांना एक विशिष्ट उग्र दर्प या काळात येतो. वातावरण थोडेसे दमट किंवा कुबट झालेले असते. अशावेळी क्वचित प्राणीपालकाला तो दर्प जाणवला नाही, तरी घरी येणाऱ्या नवख्या व्यक्तीच्या कपाळावर त्यामुळे हमखास आठी उमटते. प्राणी झोपण्याच्या ठिकाणाची सततची स्वच्छता, प्राण्याचे स्नानादी कर्मे आदी सायास करूनही अनेक प्राणीधारकांसाठी डोकेदुखी ठरणारा हा दर्प बाजारपेठेतील एका घटकाला मात्र फलदायी ठरला. पुरुषी उत्पादन म्हणून उदारीकरणानंतर लोकप्रिय झालेले डीओ स्प्रे आणि डिओड्रण्ट खास श्वान-मांजरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. सध्या ‘पेट शॉप्स’मध्ये या डिओंसाठी मागणी वाढते आहे आणि प्राणी आणि माणूस दोघांनाही भावेल अशा गंधांच्या स्प्रेचे भरपूर पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. पशुपालकांसाठी दुसरी डोकेदुखी असते ती या काळात प्राण्यांच्या गळणाऱ्या केसांबाबत. त्यासाठीही ‘डिशेडिंग ग्लोव्ह’ सारखी उत्पादने बाजारात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्पादने कोणती?

प्राण्यांच्या लाडाकोडातून अनेक उत्पादने नव्वदच्या दशकात बाजारात येऊ लागली. विकसित, श्रीमंत देशांतून सुरू झालेले हे लोण विकसनशील देशांत बघता बघता पसरले. भारत हा त्यातील एक. जगात माणसांसाठी १८८८ मध्ये ‘डिओड्रन्ट’ हा प्रकार उदयाला आला. त्यानंतर भारतात तो रुळण्यासााठी बाजारपेठेला जवळपास शंभर वर्षे कष्ट करावे लागले. मात्र प्राण्यांसाठीचे ‘डिओ’हे विद्युतवेगाने भारतात आले आणि प्राणीपालकांच्या सवयीचेही झाले. प्राण्यांचे लाड, त्यांच्यासाठी वेगळी खरेदी करण्यातील गंमत अशा वरवरच्या भावनांच्या पलीकडे जाऊन डिओ ही गरजेची वस्तू म्हणून ओळख करून देण्यात उत्पादक यशस्वी ठरले. या उत्पादनाचे उगमस्थान अमेरिका आहे. पावडर, शाम्पू, साबण, याबरोबरच प्राण्यांसाठीच्या उत्पादनांच्या यादीत डिओचा तत्काळ समावेश झाला. पावसाळ्यात प्राण्यांना येणाऱ्या दरुगधीमुळे साहजिकच प्राणीपालकांची पावले आता डिओकडे वळू लागली आहेत. प्राण्यांना चालेल आणि माणसाला आवडेल अशा गंधांमध्ये हे डिओ असतात. बहुतेकवेळा नैसर्गिक घटक म्हणजे काही फळे, फुले, वनस्पती यांच्या गंधाशी या डिओंचे साधम्र्य असते. प्राण्यांच्या त्वचेला चालेल असे घटक यात वापरले जातात. साधारण दीडशे रुपयांपासून पुढे ते दुकानात किंवा ऑनलाइन बाजारात उपलब्ध आहेत. या शिवाय दर्प नियंत्रणात ठेवण्याचा दावा करत असलेल्या पावडरही उपलब्ध आहेत. यामध्ये आता नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक उत्पादनांची चलती आहे.

प्राण्यांना दर्प का येतो?

पावसाळ्यात हवेत आद्र्रता जास्त असते. प्राण्याच्या त्वचेवरील तैलग्रंथी बंद होतात. काही जिवाणूंची वाढही प्राण्यांच्या त्वचेवर मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे पावसाळ्यात  प्राण्यांना दर्प येतो. काही वेळा त्वचा रोग असल्यासही हा दर्प येऊ शकतो. मात्र प्राण्यांची नियमित स्वच्छता ठेवल्यास हा दर्प रोखता येऊ शकतो. मात्र त्यासाठी डिओ हा अत्यावश्यक नसल्याचे मत पशुवैद्य (व्हेटर्नरी) व्यक्त करतात. त्वचेचा काही आजार असल्यास पशुवैद्यांकडे जाऊन वेळीच उपचार करून घेणेच योग्य. याबाबत डॉ. गौरव परदेशी यांनी सांगितले, ‘प्राण्यांची स्वच्छता महत्त्वाची असते. त्यांची त्वचा कोरडी ठेवणेही आवश्यक असते. पावसाळ्यात प्राण्यांना ‘ड्राय बाथ’ देता येऊ शकले. डिओ हा काही एकमेव पर्याय नाही. त्याने येणारा दर्प काही काळ झाकला जातो. मात्र त्यामुळे मूळ प्रश्न सुटत नाही. मात्र क्वचितप्रसंगी झटपट परिणामांसाठी डिओ वापरायचा झाल्यास तो प्राण्यांसाठी तयार केलेला वापरणेच योग्य ठरेल.’

प्राण्यांना साबण, पाणी वापरून आंघोळ घालण्याऐवजी त्यांना पुसून काढणे म्हणजे ‘ड्राय बाथ’. त्यासाठीही अनेक फवारे (स्प्रे) उपलब्ध आहेत. या फवाऱ्यांनी प्राण्यांची त्वचा आणि केस स्वच्छ होतात आणि जिवाणूंची वाढ रोखली जाते. त्यासाठीही अनेक औषधी फवारे बाजारात उपलब्ध आहेत

डिशेडिंग ग्लोव्ह

प्राण्यांचे केस रोज काही प्रमाणात गळतात. पावसाळ्यात बहुतेक काळ घरात असणाऱ्या प्राण्यांचे केस घरभर पसरतात. रोजच्या रोज वेळ देऊन प्राण्यांचे केस विंचरणे (ब्रश करणे) आवश्यक असते. त्यासाठी आता ‘डिशेडिंग ग्लोव्ह’ किंवा ‘ग्रूिमग ग्लोव्ह’ अशा नावाने ओळखली जाणारी उत्पादने बाजारात उपलब्ध झाली आहेत. हा ग्लोव्ह म्हणजे हातमोजा घालून प्राण्यांच्या अंगावर हात फिरवायचा की त्याला प्राण्याचे केस चिकटून येतात. जेणेकरून घरभर प्राण्याचे केस पसरण्याचे प्रमाण थोडे कमी होऊ शकते. अशा ग्लोव्हचेही अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. साधारण अडीचशे रुपयांपासून पुढे ते ऑनलाइन बाजारपेठेत उपलब्ध आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cosmetics for pet animals
First published on: 25-07-2017 at 02:49 IST