पुण्यातील कुटुंब न्यायालयात एका दाम्पत्याने स्काईपच्या मदतीने घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शनिवारी पती सिंगापूरहून पुण्यात दाखल झाला होता. मात्र कार्यालयीन कारणांमुळे पत्नीला लंडनहून पुण्यात परतणे शक्य झाले नाही. त्यामुळे पुण्यातील न्यायालयाने स्काईप सेवेचा वापर करत पत्नीची बाजू ऐकून घेतली आणि स्काईपवरच घटस्फोटाचा निर्णय कळवला.

संबंधित दाम्पत्याने संमतीने व्ही एस. मलकानपट्टे-रेड्डी यांच्याकडे घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. १२ ऑगस्ट २०१६ रोजी दाम्पत्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यामध्ये घटस्फोटाचे कारण नमूद करण्यात आले होते. ‘हिंदू रितीरिवाजानुसार ९ मे २०१५ रोजी अमरावतीमध्ये दोघांचा विवाह झाला होता. त्यानंतर ते दोघे पुण्यात स्थलांतरित झाले आणि हिंजेवडीतील दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करु लागले. त्यानंतर दोघांनी पिंपळे-सौदागरमध्ये फ्लॅटदेखील खरेदी केला,’ अशी माहिती घटस्फोटासाठी करण्यात आलेल्या अर्जात देण्यात आली होती.

‘नवे घर खरेदी करताच दोघांना परदेशात नोकरी करण्याची संधी चालून आली. पतीला सिंगापूरमध्ये तर पत्नीला लंडनमध्ये नोकरी मिळाली. पती नोकरीसाठी सिंगापूरला निघून गेला. मात्र पत्नी लंडनला जाण्याची इच्छा असूनही ती पुण्यात थांबली. लग्नामुळे करिअरमध्ये अडथळा येत असल्याचे पत्नीने म्हटले. दोघांची मते भिन्न असल्याने आणि दोघांच्या जगण्याच्या कल्पना वेगळ्या असल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ३० जून २०१५ पासून ते वेगळे राहू लागले. त्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला,’ असा तपशील शपथपत्रात देण्यात आला आहे.

या प्रकरणी दोघांचे वकील म्हणून सुचित मुंदडा पुण्यातील कुटुंब न्यायालयात हजर होते. घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पत्नी लंडनला निघून गेली होती. कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळांमुळे पत्नीला न्यायालयात हजर राहणे शक्य नव्हते. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडली जावी, अशी विनंती पत्नीकडून करण्यात आली. न्यायालयाने पत्नीची विनंती मान्य करत स्काईपच्या आधारे पत्नीशी संपर्क प्रस्थातिप करत घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी महिलेचा पती पुण्यातील न्यायालयात उपस्थित होता.