महिलेच्या मोटारीतून दागिने-रोकडची चोरी

पुणे : मोटारीतून जात असताना वडापाव खाण्याची इच्छा एका महिलेला चांगलीच महागात पडली. सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पर्स मोटारीमध्येच ठेवून वडपाव आणण्यासाठी गेलेल्या महिलेची ही पर्स चोरट्यांनी लंपास केली. त्यात तब्बल आठ लाखांचा ऐवज होता. २४ ऑगस्टला संध्याकाळी सातच्या सुमारास धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात ही घटना घडली.

एका ३५ वर्षीय महिलेने या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला सहकारनगरमधील रहिवासी आहे. २४ ऑगस्टला ही महिला मोटारीने घराकडे निघाली होती. धनकवडीतील एका चहाच्या दुकानासमोर संध्याकाळी वडापावची गाडी त्यांना दिसली. गरम वडापाव खाण्याची इच्छा निर्माण झाल्याने त्यांनी गाडी रस्त्यालगत थांबविली. सोन्याचे दागिने आणि काही रोकड असलेली पर्स त्यांच्याजवळ होती. मोटारीतून उतरताना ती त्यांनी मोटारीच्या डाव्या आसनावर ठेवली.

मोटारीतून उतरून ही महिला वडापाव घेण्यासाठी गेली. याच दरम्यान चोरट्यांनी संधी साधली. मोटारीत ठेवलेली पर्स चोरट्यांनी पळवून नेली. वडापाव घेऊन परत आल्यानंतर हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. त्यानंतर याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुधीर घाडगे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.