पुणे : आपटे रस्त्यावरील एका हाॅटेल व्यावसायिक तरुणावर झालेल्या हल्ल्याचा छडा गुन्हे शाखेने लावला. तरुणाचा खून करण्यासाठी मेहुण्याने मध्य प्रदेशातील पहिलवानांना सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. संपत्तीच्या वादातून हल्ला करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

महेश महादेव ठोंबरे (वय २८, रा. संगमवाडी, सध्या रा. आगरवाले तालीम, कसबा पेठ), अश्विनीकुमार शेषराव पाटील (वय ५२, रा. कमलनिवास, आपटे रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३१ वर्षीय तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाचे आपटे रस्ता परिसरात हॉटेल आहे. ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तरुण हॉटेल बंद करून घरी निघाला होता. त्यावेळी दोघांनी त्याला अडवले आणि पत्ता विचारण्याचा बहाणा केला.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

हाॅटेल व्यावसायिक तरुण बेसावध असल्याची संधी साधून त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एककडून समांतर तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेने आपटे रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, काँग्रेस भवन, महापालिका, मंगळवार पेठेतील गाडीतळ, मालधक्का चौकातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. संशयित आरोपी पुणे स्टेशनकडे पसार झाल्याचे दिसून आले. तांत्रिक तपासात महेश ठोंबरेचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा – “त्यांच्याकडे पहिलवान असले, तर आमच्याकडे..”, रवींद्र धंगेकर यांचा मोहोळ यांना टोला; शरद पवारांची घेतली भेट

चौकशीत हाॅटेल व्यावसायिक तरुणाचे मेहुणे अश्विनीकुमार पाटील यांनी त्याला मारण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याची माहिती मिळाली. पाटील यांच्या सांगण्यावरुन मध्य प्रदेशातील पहिलवान फैजल खान आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा – आखाड्यातील हजारो मल्ल आता मोहोळांच्या प्रचारात

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक अशिष कवठेकर, दता सोनावणे आदी कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.