पुणे : देशभरातील विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-पदव्युत्तर (सीयूईटी-पीजी) या परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) जाहीर केला. १५७ विषयांतील पहिले आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी कमी झाली असली, तरी प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

 एनटीएतर्फे होणाऱ्या सीयूईटी-पीजी परीक्षेचे यंदा तिसरे वर्ष होते. ११ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत २६२ शहरांतील ५७२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. देशभरातील १९० विद्यापीठांतील प्रवेशांसाठी संगणकावर आधारित ही परीक्षा घेण्यात आली.  त्यात प्रत्येकी ३९ केंद्रीय विद्यापीठे आणि राज्य विद्यापीठे, १५ शासकीय संस्था, ९७ अभिमत विद्यापीठे आणि खासगी विद्यापीठांचा समावेश होता.

हेही वाचा >>>धक्कादायक: पिंपरी चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणारी महिलांची टोळी गजाआड; सात दिवसांच बाळ…

 २०२२मध्ये या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ६ लाख ७ हजार ६४८ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ३४ हजार ९९७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. २०२३मध्ये परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ८ लाख ७७ हजार ४९२ विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ३९ हजार ७७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर यंदा ७ लाख ६७८ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ५ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाली. मात्र, प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक असते.