Premium

पुणे मेट्रोला दिवाळीचा असाही फटका! प्रवासी अन् उत्पन्नातही मोठी घसरण

दिवाळीच्या काळात नोकरदार आणि शाळा, महाविद्यालयांना असलेल्या सुटीचा मोठा फटका मेट्रोला बसल्याचे समोर आले आहे.

Diwali hit Pune Metro Big drop in passengers and income
मेट्रोचे दैनंदिन प्रवासी कमी झाल्याने एकूण प्रवासी संख्येत घसरण होऊन तिकीट उत्पन्नातही घट झाली.(फोटो- संग्रहित छायाचित्र)

पुणे : पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत नोव्हेंबर महिन्यात मोठी घसरण झाली होती. दिवाळीच्या काळात नोकरदार आणि शाळा, महाविद्यालयांना असलेल्या सुटीचा मोठा फटका मेट्रोला बसल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या कालावधीत मेट्रोचे दैनंदिन प्रवासी कमी झाल्याने एकूण प्रवासी संख्येत घसरण होऊन तिकीट उत्पन्नातही घट झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रोची विस्तारित सेवा ऑगस्टपासून सुरू झाली. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हे दोन विस्तारित मार्ग सुरू झाले. मेट्रोतून ऑगस्ट महिन्यात २० लाख ४७ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता आणि त्यातून मेट्रोला तीन कोटी सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. नंतर सप्टेंबर महिन्यात प्रवासी संख्या २० लाख २३ हजार होती आणि उत्पन्न दोन कोटी ९८ लाख रुपये होते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये २० लाखांवर असलेली प्रवासी संख्या ऑक्टोबरमध्ये १६ लाख ७२ हजारांवर आली. त्याच वेळी उत्पन्नही दोन कोटी ४८ लाखांवर घसरले. नंतर नोव्हेंबरमध्येही प्रवासी संख्येत घसरण झाली. मागील महिन्यात मेट्रोतून १४ लाख १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला दोन कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

आणखी वाचा-मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तास बंद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोची विस्तारित सेवा सुरू झाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कुतूहल म्हणून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे प्रवासी संख्या २० लाखांवर पोहोचली होती. नंतर ऑक्टोबरमध्ये प्रवासी संख्या १६ लाखांवर आली. मेट्रोची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या सध्या ५० हजारांवर स्थिर आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुटीमुळे प्रवासी संख्या घटली असली, तरी दिवाळीचा काळ वगळता महिनाभर दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे मेट्रोची प्रवासी संख्या घटलेली नाही.

दिवाळीच्या काळातील घसरण

दिवस – प्रवासी
१० नोव्हेंबर – ३५,६९९
११ नोव्हेंबर – ३४,३३४
१२ नोव्हेंबर – १६,४८९

मेट्रो कार्डला प्रवाशांची पसंती

पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एक पुणे कार्डला पसंती दिली जात आहे. हे प्रीपेड कार्ड असून, ते बहुउद्देशीय आहे. आतापर्यंत एकूण २८ हजार ९३० मेट्रो कार्डचे वितरण करण्यात आले आहे. त्यात विद्यार्थ्यांची संख्या चार हजार १३६ असून, त्यांना मेट्रोच्या तिकिटात ३० टक्के सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Diwali hit pune metro big drop in passengers and income pune print news stj 05 mrj

First published on: 07-12-2023 at 11:21 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा