पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्याला चाकूने भासकून ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका हॉटेल समोर घडली आहे. या प्रकरणी आरोपी रिपन सबुर एस.के. याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर प्राणी बचाव समितीच्या सदस्य असलेल्या प्राजक्ता कुणाल सिंग यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. हॉटेल समोर वारंवार कुत्रा येत असल्याने त्याला ठार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वाकड मधील मुडीफूड हॉटेल येथे कामगार होता. तो कुत्रा नेहमी हॉटेल समोर यायचा. दरम्यान, फिर्यादी प्राजक्ता या हॉटेल शेजारीच राहतात. त्या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असत. त्यामुळे तो कुत्रा तिथं येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी रिपनने सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कुत्र्याला पकडून चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. फिर्यादी यांनी संबंधित घटना प्रत्यक्षात पाहिली. दरम्यान, त्या तातडीने कुत्र्याला औंध येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे घेऊन गेल्या. परंतु, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. आरोपी रिपेनवर प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिसांनी अटक केली आहे.