मुलाखत : डॉ. निखिल गोखले
डॉल्बीच्या दणदणाटात गणेश विसर्जन मिरवणूक झाली. अनेकांनी अगदी ध्वनिक्षेपकाच्या भिंतींवर चढून नाचण्याची झिंग अनुभवली. मात्र अनेकांना मिरवणुकीत डोके दुखणे, मळमळ, रक्तदाब वाढणे, चक्कर येणे अशा त्रासालाही सामोरे जावे लागले. गर्दी हे त्याचे जसे कारण होते. त्याचप्रमाणे आवाजाची सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली पातळी हे या त्रासामागचे मुख्य कारण आहे. ध्वनिवर्धकांच्या भिंती उभ्या करून त्याच्या समोर नाचणारे कार्यकर्तेही मिरवणुकीनंतर कानात दडे बसल्याचेच अनुभवत आहेत. मिरवणुकांनंतर कान दुखण्याच्या, ऐकू कमी येत असल्याच्या समस्या घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे गर्दी करताना दिसतात. याबाबत कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. निखिल गोखले यांच्याशी केलेली बातचीत.
कोणत्या पातळीपर्यंत आवाज सहन करता येऊ शकतो?
माणूस सामान्य आवाजात बोलतो त्याची पातळी ३० डेसिबलपर्यंत असते. वाहने किंवा काही यंत्रांचा आवाज हा ५० ते ६० डेसिबलपर्यंत असतो. एखाद्या कारखान्यातील आवाज हा ८० ते १०० डेसिबलपर्यंत असतो. डॉल्बीचा आवाज मात्र ११० डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिकही असतो. ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करता येतो. त्यापुढील आवाज सातत्याने ऐकला तर त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. कानात कापूस घालणे किंवा असे उपाय करून काही प्रमाणात होणारा त्रास कमी करता येऊ शकतो. मात्र हा निश्चित स्वरूपातील उपाय नाही.
मोठय़ा आवाजामुळे कोणत्या समस्या उद्भवतात?
मोठय़ा आवाजामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल. पहिला प्रकार म्हणजे श्रवणशक्तीवर होणारा परिणाम किंवा ऐकण्याच्या समस्या. दुसरा भाग म्हणजे मानसिक किंवा इतर शारीरिक परिणाम. ऐकण्याच्या समस्यांचा विचार केला तर तात्पुरते कमी ऐकू येणे किंवा अगदी कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. मिरवणुकीमध्ये जाणवत नाही मात्र त्यानंतर काही वेळाने ऐकू कमी येत असल्याचे किंवा दडे बसल्याचे जाणवते. हा परिणाम दोन-तीन दिवस राहू शकतो. त्यानंतर हळूहळू त्याचा परिणाम कमी होतो आणि ऐकू येऊ शकते. मात्र काहीवेळा मोठय़ा आवाजामुळे कानाचा पडदा, नसा यांवर गंभीर आघात होतात आणि परिणामी कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. त्याचप्रमाणे कानात सतत एखादा आवाज येत राहतो (रिंगिंग इअर) हा त्रासही तात्पुरता किंवा कायम स्वरूपाचा होऊ शकतो. ऐकण्याबाबतच्या समस्यांव्यतिरिक्त मोठय़ा आवाजाचे शरीरावर इतरही अनेक दुष्परिणाम होतात. रक्तदाब वाढतो, डोके दुखते, घाबरल्यासारखे होते, छातीत धडधडते. मोठा आवाज कानाच्या माध्यमातून मेंदू आणि शरीरापर्यंत पोहोचल्यावर हा शरीराकडून मिळणारा प्रतिसाद असतो.
ऐंशी ते शंभर डेसिबल यामध्ये २० डेसिबलचाच फरक असताना त्याचा परिणाम इतका तीव्र कसा होतो?
डेसिबल हे आवाज मापनाचे एकक मोजताना १०, २०, ३० असे दिसते. मात्र दोन डेसिबल पातळ्यांमध्ये असलेला फरक हा दहाच्या पटीत वाढत जातो. त्यामुळे ८० आणि ११० या दोन आकडय़ांमध्ये तीसचा फरक असला तरी त्यामध्ये प्रत्यक्षातील फरक दहापटीने अधिक असतो. त्यामुळे ८० डेसिबल आणि ११० डेसिबल यांच्यातील आवाजाच्या तीव्रतेत मोठा फरक पडतो.
ध्वनिवर्धकाच्या जवळ नाचणाऱ्यांना नाचताना काही त्रास कसा होत नाही?
सामान्यपणे ध्वनिवर्धकांच्या जवळ नाचणाऱ्यांची काही वेळानंतर ऐकू येण्याची क्षमता कमी होते. त्यावेळी होणारे परिणाम लक्षात येत नाहीत. मात्र आवाज बंद झाला की ऐकू येत नसल्याची, डोके जड झाल्याची जाणीव होते. हा परिणाम पुढील दोन-तीन दिवस टिकू शकतो. वार्धक्यामध्ये काहीवेळा ऐकण्याची क्षमता थोडी कमी झालेली असते. मात्र वृद्ध व्यक्तींना एखादा आवाज परत परत आला की तो कर्कश्श वाटतो. त्या तुलनेने तरुणांची सहनशक्ती जास्त असते. त्यामुळे ते आवाज सहन करू शकतात.
पारंपरिक वाद्यांचा आवाज सहन करता येतो, हे बरोबर आहे का?
आवाजाच्या बाबत कोणता आवाज यापेक्षा त्याची पातळी किती हे महत्त्वाचे असते. पारंपरिक वाद्यांचा आवाजाच्या पातळीत आणि डॉल्बीच्या आवाजाच्या पातळीत फरक आहे. मात्र तरीही अनेक ढोल, ताशे एकावेळी वाजू लागले आणि आवाजाची पातळी वाढली तर त्याचाही त्रास होतो. मात्र पारंपरिक वाद्यांच्या आवाजाची पातळी नेमकी किती असते. त्याचा काय परिणाम होतो याबाबत अद्याप वैज्ञानिकदृष्टय़ा काही निश्चित निष्कर्ष नाहीत.
तात्पुरती ऐकण्याची समस्या आहे किंवा कायमचा बहिरेपणा कसा ओळखावा, मिरवणुकीतील आवाजानंतर कमी ऐकू येते असे वाटले तर काय करावे?
मिरवणुकीनंतर एक-दोन दिवसांनंतरही कमी ऐकू येत असेल तर ही समस्या तात्पुरती आहे की कायमचा बहिरेपणा आहे यासाठी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. कानाची तपासणी केल्यानंतर डॉक्टर याबाबत निदान करू शकतात. तात्पुरती समस्या असल्यास काही औषधांनी ती बरी होऊ शकते. मात्र बहिरेपणाची पातळी जास्त असल्यास त्यावर वेळीच वैद्यकीय उपचार घेणे योग्य ठरते. ऑडिओमेट्री म्हणजे ऐकण्याच्या क्षमतेची तपासणी करून पातळी ठरवली जाते.
