प्रकाश खाडे, जेजुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीक्षेत्र जेजुरी येथे खंडेरायाच्या नगरीत दरवर्षीप्रमाणे पौष पौर्णिमेचा पारंपारिक गाढव बाजार चार दिवसापासून भरला आहे. बंगाळी पटांगण येथे भरलेल्या गाढव बाजारात १ हजार गाढवे महाराष्ट्राच्या विविध भागातून विक्रीसाठी आली आहेत. राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे, त्याचे सावट गाढव बाजारावर जाणवले,नेहमीसारखी बाजारात उलाढाल झाली नाही.गुजरातमधील अमरेली येथून दीडशे काठेवाडी गाढवे तेथील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणली होती. या गाढवांना ३० हजारापासून ७० हजार रुपयापर्यंत भाव मिळाला, तर गावरान गाढवांच्या किमती १० हजारांपासून २५ हजारपर्यंत होत्या. दरवर्षी गुजरात मधील काठेवाड, सौराष्ट्र,जुनागड,भावनगर, राजकोट,अमरेली येथून बरेचसे व्यापारी काठेवाडी गाढवी विक्रीसाठी आणतात,यंदा मात्र व्यापारी कमी आले. यंदा गाढवांच्या किमतीत वाढ झाली आहे पाणीटंचाईमुळे बांधकाम क्षेत्र, वीट भट्ट्या व्यवसाय अडचणीत आले आहेत, गाढवे घेऊन करणार काय असे काही व्यवसायिकांनी सांगितले.

बाजारात गाढवांना विक्रीसाठी आणताना स्वच्छ धुऊन त्यांच्या अंगावर आकर्षक रंगीबेरंगी पट्टे ओढून त्यांना सजवून आणले जाते, खरेदी करताना व्यापारी गाढवाचे दात पाहून खरेदी करतात. अखंड गाढवाला मागणी जास्त असते,अखंड म्हणजे बारा महिन्याच्या आतील गाढव मानले जाते.दोन दाताच्या गाढवाला दुवान,चार दाताच्या गाढवाला चौवान, व सहा दाताच्या गाढवाला कोरा म्हणतात त्याला मागणी कमी असते. काठेवाडी गाढवामध्ये अंगावरील केसांच्या रंगावरूनही किंमत ठरते, ही गाढवे गावरान गाढवांपेक्षा दिसायला उंची पुरी असतात व कामाला दणकट असल्याने त्यांच्या किमती जास्त राहतात.

गाढव खरेदी करण्यासाठी प्रामुख्याने वैदु,बेलदार, कैकाडी, माती वडार,कुंभार, परीट, गारुडी, मदारी आदि समाजबांधव येतात,गाढव त्यांच्या रोजच्या व्यवसायातील एक मोठा भाग मानले जाते. सध्याच्या आधुनिक काळामध्ये बांधकामावर दगड माती उचलण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर,जेसीबी, आदि मशीनरी चा वापर होत आहे. पण अडचणीच्या ठिकाणी, डोंगरदऱ्यामध्ये, वीट भट्टीवर अजूनही गाढवाची आवश्यकता लागतेच. जेथे वाहन पोचू शकत नाही.त्या ठिकाणी मुरुम, दगड, विटा इतर सामान वाहतूक करण्यासाठी गाढवांचा उपयोग होतो.पूर्वी जेजुरी येथील पौष पौर्णिमेला भरणाऱ्या गाढव बाजारानंतर दुसऱ्या दिवशी वैदु व भातू कोल्हाटी समाजाच्या पारंपारिक जातपंचायती भरत होत्या.मात्र दहा वर्षांपूर्वी शासनाने या जातपंचायतीवर बंदी घातल्याने येथील न्याय निवाड्याचे काम बंद झालेले आहे. पूर्वी बाजारात तीन साडेतीन हजार गाढवे विक्रीसाठी येत होती आता ही संख्या ही घटत चालली असून गाढव बाजाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा बाजार पुणे -निरा रस्त्यावरील बंगाळी पटांगणावर भरतो,मात्र या पटांगणावर पोस्ट ऑफिस,स्वच्छता गृह, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा,आदि बांधकामे झाल्याने गाढव बाजारासाठी पुरेशी जागा उरली नाही. गाढवांच्या वाट्याला उपेक्षा आली आहे.अपुऱ्या जागे अभावी गुजरातहून आलेली काठेवाडी गाढवे दररोज भरणाऱ्या भाजी बाजारात उभी करावी लागली, एका बाजूला भाजी बाजार तर तेथेच गाढव बाजार असे दृश्य पहायला मिळाले. जेजुरीप्रमाणे मढी (कानिफनाथ) माळेगाव,उज्जैन येथेही पारंपारिक गाढव बाजार भरतात.बाजारात अनेक व्यवहार कोणतीही लिखापढी न करता तोंडी होतात.पैसे दुसऱ्या गावातील पुढच्या यात्रेत दिले जातात. सर्व व्यवहार विश्वासाने चालतात.

मराठवाड्यात शेती कामासाठी गाढवांचे उपयोग

नांदेड येथून आलेले शेतकरी संतोष भुसलवड यांनी दीड लाखात तीन काठेवाडी गाढवे खरेदी केली. शेतातील सोयाबीन व तूर वाहण्यासाठी आम्ही गाढवाचा उपयोग करतो. प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी आम्हाला गाढवाची मदत होते. एक गाढव व एक गडी बारा तास काम केल्यानंतर आम्हाला अडीच ते तीन हजार रुपये मिळतात असे त्यांनी सांगितले . आजच्या बाजारात सांगली मिरज बार्शी इंदापूर येथून अनेक व्यावसायिक गाढव खरेदीसाठी आले होते. मात्र दुष्काळाची चिंता साऱ्यांच्याच चेहऱ्यावरती होती.

वडारी समाजाकडून जेजुरी नगरपालिकेचा निषेध

जेजुरीचा पारंपारिक बाजार भरणाऱ्या बंगाळी पटांगणात स्वच्छता अजिबात केली नाही.माणसांना व गाढवांना पिण्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले नाहीत,पुरेशी लाईट व्यवस्था नाही, नगरपालिकेला पत्र देऊनही गाढव बाजाराकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती वडारी समाजाचे माजी तालुकाध्यक्ष विजय पवार ,जेजुरी अध्यक्ष खंडेराव जाधव, रामोशी समाजाचे संघटकअशोक खोमणे यांनी दिली.जेजुरी नगरपालिकेचा त्यांनी निषेध केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought hits traditional market in jejuri kathevadi donkey costs rs 70000 scj
Show comments