जखमी प्राण्यांसाठी आसरा आणि कचऱ्याचा पुनर्वापर असे दोन हेतू साध्य करणारे ‘प्राण्यांसाठीचे घर’ पीपल फॉर अ‍ॅनिमल (पीएफए) या संस्थेतर्फे पिसोळीजवळील होळकर वाडी येथे चालविण्यात येत आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्या, टायर, काचेच्या बाटल्यांचे उपयोगी वस्तूंमध्ये रुपांतर करुन पर्यावरण आणि प्राणी दोघांची काळजी येथे घेतली जाते.
जखमी प्राण्यांना आणि पक्ष्यांना या घरामध्ये आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम पीएफएचे कार्यकर्ते करतात. जे प्राणी पुन्हा स्वतच्या पायावर उभे राहू शकतील त्यांना परत सोडले जाते. परंतु, जे कायमचे जायबंदी झाले आहेत त्यांना भीमाशंकर येथील पुनर्वसन केंद्रात ठेवले जाते. हे शेल्टरचे काम सुरू होऊन केवळ दोन महिने झाले असून अत्तापर्यंत सुमारे शंभर प्राण्यांवर उपचार केलेले आहेत, अशी माहिती पीएफएचे संस्थापक मनोज ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या घराच्या भिंती काचेच्या बाटल्या वापरुन तयार केल्या आहेत. टायरचा वापर कुंडय़ा म्हणून, तसेच कुत्र्यांना झोपण्यासाठी केला जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्या पक्ष्यांचे खाद्य ठेवण्यासाठी व रोपे लावण्यासाठी केला जातो. लोकांनी श्रमदान करुन अथवा बाटल्या, टायर यांसारखा कचरा देऊन मदत करावी. अधिक माहितीसाठी मनोज ओसवाल (९८९००४४४५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पीएफएतर्फे करण्यात आले आहे.