वेगवेगळे लढल्यामुळे प्रत्येक पक्षाला आपले स्थान ओळखण्याची संधी मिळाली आहे. अर्जुनाला जसा केवळ माशाचा डोळा दिसत होता, तसे माझे लक्ष्य राष्ट्रवादीच्या शंभर टक्के यशाकडे आहे. आम्ही स्वबळावरच सरकार स्थापनेचा विचार करू, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षासोबत जाण्याच्या आरोप पत्रकार परिषदेत फेटाळला. भाजपनेच याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली असताना काँग्रेसकडून त्याबाबत का बोलले जाते, असा प्रश्नही त्यांनी केला.
भाजपसोबत जाण्याबाबत काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या आरोपाबाबत पवार म्हणाले, १९९९ मध्येही काँग्रेसने हाच आरोप केला होता. २००४ मध्ये आमचे सदस्य जास्त असताना त्या वेळी वेगळी भूमिका घेता आली असती, पण आम्ही काँग्रेसचा मुख्यमंत्री स्वीकारला. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना राज्याच्या राजकारणाचे ज्ञान कमी असले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्याचा कारभार करू शकणारे अनेक सदस्य आहेत. त्यामुळे त्याबाबत आम्हाला चिंता नाही.
पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते यांच्या दरम्यान होणाऱ्या टीकांबाबत पवार म्हणाले, निवडणुकीला सामोरे जाताना आपला कार्यक्रम सांगावा. वैयक्तिक टीका टाळली पाहिजे. चव्हाणांकडूनही टीका झाली, पण मी त्यांना सांगू शकत नाही. आमच्या लोकांना मात्र टीका न करण्याबाबत सांगू शकतो. चव्हाण यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचे माझे मत होते. मात्र, स्थानिक पातळीवर तो निर्णय झाला.
मोदींच्या प्रभावाबाबत ते म्हणाले, राज्यातील निवडणुकांमध्येही आता मोदींना शक्ती द्या, असे सांगितले जाते. पण, राज्याचे प्रशासन चालविण्यास मोदी येणार नाहीत, इथेच कुणाला तरी ते चालवावे लागेल. लोकसभेनंतर झालेल्या उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला, हा बदल पुरेसा बोलका आहे. देशाचे नेतृत्व एकावर, तर राज्यातील जबाबदारी अन्य घटकांवर, असे लोकांच्या मनात असल्याचा निष्कर्ष आपण काढू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातही वेगळे चित्र दिसेल.
‘मोदींचे प्राधान्य कशाला हे लक्षात येते’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात पंधरा सभा होणार असल्याबाबत शरद पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, पंतप्रधान एका पक्षाचे घटक आहेत. त्यामुळे निवडणुकीत सभा घेण्याबाबत अडचण नाही. पण, राज्यातील निवडणुकांत अनेक सभा घेऊन इथे जास्त वेळ देण्यातून त्यांचे प्राधान्य कशाला आहे, हे लक्षात येते. विविध पंतप्रधानांचे अमेरिका दौरे मी पाहिले आहेत. मनमोहन सिंग यांनाही अमेरिकेत मोठा आदर आहे, पण त्याचे मार्केटिंग कधी त्यांनी केले नाही. सुसंवाद कसा होईल, हे त्यांनी पाहिले. यंदा सुसंवाद किती झाला हे माहीत नाही, पण हा संवाद करताना मोदी यांची एक नजर प्रसार माध्यमांद्वारे भारतात होती.
‘राज ठाकरे यांचा मी आभारी’
युती तुटण्यात शरद पवार असल्याबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबाबत पवार यांनी राज यांना टोला लगावला. ते म्हणाले, सेना व भाजपची युती तुटण्यात आमचा काहीही संबंध नाही. पण, राज ठाकरे यांचा मी आभारी आहे, कारण त्यांनी केलेल्या आरोपानुसार भाजपमधील धोरणेही मी ठरवू शकतो, या निष्कर्षांवर ते आले.