पुण्याजवळील चाकण येथे लवकरात लवकर विमानतळ उभे राहावे यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न चालू असून त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आली असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगितले.
कॉन्फेरडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष म्हणून बोलत होते. सीआयआयचे राज्याचे अध्यक्ष निनाद करपे, पश्चिम विभागीय अध्यक्ष आर. मुकुंदन, पुणे विभागीय अध्यक्ष राजीव भिडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘चाकण विमानतळासाठी आवश्यक असणारी जमीन संपादन करणे, पर्यावरण आणि इतर बाबी या मंजुरी मिळवण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे.’ औद्योगिक क्षेत्रापुढील समस्या सोडविण्याबरोबरच शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कॉर्निग इंडियाच्या प्रकल्पाचे उद्घाटन
कॉर्निग इंडिया कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ‘खाजगी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता असल्यामुळे राज्य शासनाचे खासगी क्षेत्रात गुंतवणुकीस प्राधान्य राहील, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते, अमेरिकेचे भारतातील काउन्सिल मेंबर पीटर हास, कंपनीचे उपाध्यक्ष स्टीफन मेलर आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रुस्तम देसाई उपस्थित होते.