पुणे : समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पहिल्याच जोरदार पावसाने अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वाहतुकीचा वेग मंदावल्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासनाकडे गेल्या पाच दिवसांत पाचशेहून अधिक तक्राही आल्या आहेत.

वर्षभरापासून सुरू असलेली कामे अद्यापही अपूर्ण असल्याने पावसाळ्यातील जुलै महिन्यात भरपावसात शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. गेल्या सात दिवसांपासून शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधारांमुळे महापालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीवर आत्तापर्यंत केलेला खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tree cutting branches on the road negligence of Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा
unique solution to traffic congestion in Pune A two-wheeled ambulance will run on the road
पुण्यातील वाहतूक कोंडीवर अनोखा उपाय! रस्त्यावर धावणार दुचाकी रुग्णवाहिका
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

नक्की वाचा >>Maharashtra News Live : महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी, धरणात आता समाधानकारक जलसाठा

महापालिकेच्या पाणीपुरवठा, पथ विभाग, मलनिस्सारण विभागाबरोबरच क्षेत्रीय कार्यालयांकडून विविध कामे केली जातात. त्यामुळे रस्ते खोदाई केली जाते. शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यासह सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेतील अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात आले होते. गेल्या वर्षी करोना काळात पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांवर खोदाई करण्यात आली होती. ही कामे १५ मे अखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पंधरा मे नंतर रस्ते खोदाईला परवानगी दिली जाणार नाही. तसेच रस्त्याची कोणतीही कामे केली जाणार नाहीत. पंधरा मेपासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रस्ते पूर्ववत करण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र मुदतीमध्ये कामे पूर्ण न झाल्याने शहराच्या उपनगरात रस्त्याची कामे जुलै महिन्यातही सुरू राहिली.

रस्ते खोदाईच्या कामांना मुदतवाढ दिल्याने रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. खोदाईची कामे पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची डागडुजी करता येत नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात रस्ते पूर्ववत करण्याची कामे महापालिकेच्या पथ विभागाला सुरू करावी लागली. घाईगडबडीत कामे झाल्याने कामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यातच गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्ते दुरुस्तीची पोलखोल केली आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्याने त्रास होत असल्याच्या पाचशेहून अधिक तक्रारी महापालिकेच्या पथ विभागाकडे दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, सततच्या पावसाने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. समान पाणीपुरवठा आणि मल:निस्सारण विभागाने ज्या ठिकाणी कामे केली त्या रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या विटा आणि ब्लॉकचा वापर करून खड्डे बुजविले जात आहेत. गेल्या पाच ते सात दिवसांत चारशे खड्डे बुजविण्यात आले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर केली जातील, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

गतवर्षीही हाच प्रकार

गेल्या वर्षीही पावसाळ्यातच रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. मात्र ती कामे घाईगडबडीत करण्यात आली. अशास्त्रीय पद्धतीने कामे झाल्याने अल्पावधीतच रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यावर केलेला कोट्यवधींचा खर्चही वाया गेला होता. रस्ते दुरुस्तीसाठी कमी कालावधी मिळणार असल्याने कामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

रात्रीही खड्डे बुजविण्याचे काम- आयुक्त

शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे आदेश आयुक्तांनी पथ विभागाला दिले आहेत. रात्रीतही कामे करण्याची सूचना करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवर खड्डे पडलेले असता पथ विभागाने सात कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यक्षेत्रात अतिशय संथ गतीने काम सुरू केले आहे. या अधिकाऱ्यांना मंगळवारी दिवसभरात १३३ खड्डे बुजविण्याचे उद्दिष्ट दिलेले होते. पण त्यापैकी फक्त ५३ खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर ८० खड्डे बुजवू शकलेले नाहीत.