पुणे-नाशिक मार्गावर चाकणजवळील वाकी येथे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर शरद बोऱ्हाडे यांच्या मुलासह तिघांचा कार अपघातात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. नाईट क्रिकेट खेळण्यासाठी जात असताना नियंत्रण सुटून मोटार पुलाच्या कठडय़ाला धडकून नाल्यात कोसळली. यामध्ये दोघेजण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रीतम शरद बोऱ्हाडे (वय २४), सागर रामचंद परदेशी (वय २६) आणि बापू उर्फ प्रतिक विनोद साताडकर (वय २३ रा. मोशी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, सोमनाथ विठ्ठल बोऱ्हाडे (वय ३३) आणि स्वप्निल सुभाष बोरोटे (वय २१) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-राजगुरूनगर परिसरात रात्री क्रिकेट सामने मोठय़ा प्रमाणात खेळले जातात. राजगुरूनगर येथे सर्वजन रात्री क्रिकेट सामने खेळण्यासाठी व्ॉगनर मोटारीतून जात होते. रात्री सव्वा अकराच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी येथे वळणाचा अंदाज न आल्यामुळे कार चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. मोटार पुलाच्या कठडय़ाला धडकून नाल्यात कोसळली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाले. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.