भिडे पुलावर खांब; दुचाकीस्वार, रिक्षाचालकांना पूल वापरण्याची मुभा

पुणे : डेक्कन जिमखाना भागातील भिडे पुलावर वाहतूक पोलिसांकडून पुलाच्या दोन्ही बाजूंकडील प्रवेशांपाशी खांब उभे करण्यात आल्यामुळे नदीपात्रातील रस्त्यांचा वापर मोटार, टेम्पोसह चारचाकी वाहनांना करता येणार नाही.

डेक्कन आणि नारायण पेठ भागाला जोडणाऱ्या भिडे पुलावरून मोठय़ा संख्येने मोटारी, टेम्पो, रिक्षा तसेच जड वाहने जातात. वास्तविक हा पूल दुचाकींसारख्या हलक्या वाहनांसाठी महापालिकेकडून बांधण्यात आला. मात्र, या पुलाचा मोटारचालक तसेच टेम्पोचालकांकडून सर्रास वापर होत होता. भिडे पुलाच्या दुतर्फा पोलिसांनी मोटारींना वापरण्यास मनाई असा फलकदेखील लावला होता. मात्र, अनेक मोटारचालक या पुलाचा वापर करायचे. त्यामुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी या पुलावर कोंडी व्हायची तसेच वाहनांच्या रांगा लागल्याचे दृश्य पाहायला मिळायचे.

कोथरूड, एरंडवणेच्या दिशेने जाणारे दुचाकीस्वार नदीपात्रातील रस्त्याचा वापर पर्यायी मार्ग म्हणून करायचे. भिडे पुलावर यायचे. तेथून डेक्कन मार्गे कोथरूड, एरंडवणे तसेच डेक्कनच्या दिशेने दुचाकीस्वार जायचे. भिडे पुलावर खांब उभे करण्यात आल्यामुळे नदीपात्रातील रस्त्यांचा वापर मोटारींसह अन्य चारचाकी वाहनांना करता येणे शक्य नाही.

याबाबत डेक्कन वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर म्हणाले,की भिडे पुलावर खांब उभे करण्यात आल्यामुळे आता भिडे पुलाचा वापर चारचाकी वाहनांना करता येणार नाही. नदीपात्रातील रस्त्याने येणाऱ्या चारचाकी वाहनांना डेक्कन तसेच नारायण पेठेत जाणे शक्य होणार नाही. पुलाच्या प्रवेशापाशी खांब  उभे करण्यात आले आहेत. समजा एखादा मोटारचालक अनवधानाने भिडे पुलाच्या दिशेने आलाच तर त्याला वळण्यास जागा ठेवण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग म्हणून वापर

कोथरूड, एरंडवणेच्या दिशेने जाणारे तसेच येणारे दुचाकीस्वार भिडे पुलामार्गे इच्छित स्थळी जातात. डेक्कन येथील रस्त्याने दुचाकीस्वार खिलारेवाडीतील रजपूत वीट भट्टीच्या दिशेने एरंडवणे गावठाणात येतात. नदीपात्रातून एरंडवणे गावठाणात येणारा छोटा रस्ता खासगी मालकीच्या जागेतून जातो. त्यामुळे तेथे लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत.

भिडे पुलाचा मोठय़ा प्रमाणावर चारचाकी वाहनांकडून वापर होत होता. या पुलाचा वापर मोटारी तसेच चारचाकी वाहनांकडून होत असल्याने डेक्कन तसेच नारायण पेठ भागात कोंडी व्हायची. त्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत व्हायची. भिडे पुलाच्या दोन्ही बाजूला प्रवेश करण्याच्या ठिकाणी खांब उभे करण्यात आले आहेत. भिडे पुलाचा वापर दुचाकीस्वार तसेच रिक्षाचालक करू शकतील.

– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा