तुला सेवेची इच्छा आहे ना, हातात एक पाण्याचा जग घे आणि दोन ग्लास घेऊन लोकांना पाणी वाटायला सुरुवात कर.. बच्चुभाई भायाणी यांना सेवेची इतकी साधी-सोपी व्याख्या

बच्चुभाई भायाणी

त्यांच्या एका परिचिताने सांगितली होती.. बच्चुभाई त्याही पुढे गेले.. त्यांनी रणरणत्या उन्हात पांथस्थांना दिलासा देण्यासाठी थंडगार ताकाचे वाटप सुरू केले आणि या ताकपोयीचे यंदा चौदावे वर्ष आहे.
लक्ष्मीदास ऊर्फ बच्चुभाई भायाणी यांचा शुक्रवार पेठेत बदामी हौद चौकाजवळ मंगल कार्यासाठी लागणारी भांडी भाडय़ाने देण्याचा व्यवसाय आहे. पूर्वी चाळीत राहात असताना उन्हाळ्यात ऐन दुपारी तहानलेली मुले त्यांच्या घरी पाणी मागायला येत आणि थंड पाणी देतानाच बच्चुभाई त्यांना कधीकधी फ्रीजमधील बर्फही देत. एकदा मुलांना थंडगार पाणी देताना बच्चुभाईंच्या मनात विचार आला, थंड पाण्याऐवजी उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी ताक दिले तर..
याच विचाराने बच्चुभाईंनी दुकानासमोरच ‘ताकपोयी’ चा उपक्रम सुरू केला आणि सलग तेरा वर्षे ही ताकपोयी त्यांनी स्वखर्चातून सुरू ठेवली आहे. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून ते पावसाळ्यात पहिला जोरदार पाऊस पडेपर्यंत; असे सुमारे तीन महिने रोज सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा-एक या वेळेत हे ताकवाटपाचे काम चालते. येणाऱ्या प्रत्येकासाठी ही ताकपोयी खुली असते. ताकपोयी सुरू होते, तेव्हा ती पाच लिटर दुधापासून सुरू होते आणि नंतर उन्हाळा वाढला की, प्रतिसाद वाढतो नंतर रोज दहा-बारा लिटर दुधाचे ताक करावे लागते, असे बच्चुभाई सांगतात. रोज दूध आणून ते तापवणे, संध्याकाळी त्याचे दही लावणे, सकाळी दही घुसळून ताक तयार करणे, जिरे पूड आणि मिठाने ते चवीष्ट करणे ही कामे बच्चुभाईंच्या दुकानातील महिला अडीच-तीन महिने उत्स्फूर्तपणे करतात आणि थंडगार ताकाचे वाटप व इतर कामे पुरुष मंडळी करतात. रोज अडीचशे ते तीनशे जणांना ही मंडळी ताक वाटतात. अनेकदा ही संख्या त्याच्याही पुढे जाते.
अनेकजण या उपक्रमाचे आवर्जून कौतुक करतात आणि बच्चुभाईंना काही अर्थसाहाय्य देण्याचीही तयारी दर्शवतात. अशावेळी त्यांना नम्रतेने नकार देत शहात्तर वर्षीय बच्चुभाई ‘तुम्हीसुद्धा जमेल त्या पद्धताने असेच काही तरी काम करा,’ एवढीच विनंती त्यांना करतात आणि दरवर्षी उन्हाळ्यात उत्साहाने स्वमेहनतीतूनच ताकपोयीचे काम सुरू ठेवतात.