जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही. नायर हे शुक्रवारी शहीद झाले. त्यांच्यावर लष्करी इतमामात पुणे येथे आज (रविवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. नायर यांच्या मावशीच्या १२ वर्षीय मुलाने मुखाग्नी दिला. ‘अमर रहे अमर रहे, मेजर शशीधरन अमर रहे’ तसेच ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही. नायर यांचे पार्थिव शनिवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल येथे आणण्यात आले. त्यानंतर आज सकाळी खडकवासला येथील घरी मेजर नायर यांचे पार्थिव नेण्यात आले. यावेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी खडकवासला भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. काही वेळानंतर अंत्ययात्रेस सुरुवात झाल्यानंतर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये ‘अमर रहे अमर रहे, मेजर शशीधरन अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शशीधरन यांच्या पत्नी तृप्ती, आई लता आणि बहीण सीना तसेच लष्कराच्या अनेक विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नायर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. आश्वत नायर (वय १२) याने मुखाग्नी दिला.

साडेअकराच्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे आदी उपस्थित होते.