पुणे : नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांचे म्होरक्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. मंगळवारी पोलीस आयुक्तालयात गुंड गजानन मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, सचिन पोटे यांच्यासह ३०० गुंडांची चौकशी करून त्यांना समज देण्यात आली.

हेही वाचा >>> पुण्यात हेल्मेटसक्तीला काँग्रेसचा विरोध; नवनियुक्त पोलीस आयुक्तांची घेतली भेट

अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर गुंडगिरीचा बिमोड करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेने शहरातील गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. मंगळवारी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेतील गुंड गजानन मारणे, बाबा बोडके यांच्यासह विविध टोळ्यांच्या म्होरक्यांना बोलाविण्यात आले. गुंड टोळ्यांचे प्रमुख, त्यांच्या साथीदारांना रांगेत उभे करून त्यांची गु्न्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी चौकशी केली. शहरातील दहा टोळ्यांचे प्रमुखांसह गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या २१ टोळ्यांच्या म्होरक्यांची चौकशी करण्यात आली. पोलीस उपायु्कत अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे यांनी गुंडांना समज दिली. गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी चाैकशी केली. पोलीस कोणाचे शत्रू नाहीत. आम्ही नागरिकांशी सुरक्षेशी बांधील आहेत. मात्र, ज्यांना कायद्याचे पालन करायचे नसेल तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी गुंडांना दिला होता.