scorecardresearch

मानाच्या मंडळांच्या दिमाखदार मिरवणुका

मानाच्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लक्ष्मी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी उसळली होती.

मानाच्या मंडळांच्या दिमाखदार मिरवणुका

ढोल-ताशांच्या गजरात गणरायांना निरोप

ढोल-ताशांचे पारंपरिक वादन, मोरया-मोरयाचा अखंड गजर, रांगोळ्यांच्या पायघडय़ा, फुलांनी सजविलेले रथ अशा चैतन्याच्या आणि उत्साहाच्या वातावरणात मानाच्या पाचही गणपतींची मंगळवारी निघालेली मिरवणूक दिमाखदार ठरली. पारंपरिक खेळ, मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी झालेली अलोट गर्दी, विविध विषयांवर जनजागृती करणारी मिरवणुकीतील पथके, परदेशी नागरिकांचा सहभाग ही यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची वैशिष्टय़े ठरली. मानाच्या पाचही गणपतींची विसर्जन मिरवणूक नऊ तास अठ्ठावीस मिनिटे चालली.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त यंदा मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या मंडळांच्या मिरवणुकीला पहिल्या कसबा गणपती मंडळाच्या ‘श्रीं’ची आरती महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये झाल्यानंतर साडेदहा वाजता प्रारंभ झाला. ही मिरवणूक दिमाखदार होती. मंडई, बेलबाग मार्गे मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर आली. ढोल-ताशांचे पारंपरिक वादन, पथकांकडून सादर करण्यात आलेले विविध ताल, त्याला पारंपरिक वेशभूषेची मिळालेली साथ, मलखांबांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरणामुळे अशी ही मिरवणूक शाही थाटातील ठरली. भर उन्हातही गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मानाच्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लक्ष्मी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी उसळली होती.

कसबा electricity decoration मोरया-मोरयाचा गजर, चांदीच्या पालखीत विराजमान श्रींची विलोभनीय मूर्ती हे कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले. मराठी सिनेकलावंतांचे ढोलपथक, रमणबाग प्रशालेच्या पथकाचे बहारदार वादन, त्या तालावर आकाशी उंच झेपाविणारा भगवा ध्वज अशा उत्साही वातावरणाचा साज मिरवणुकीच्या निमित्ताने उपस्थितांनी अनुभवला. पुण्याचा जुना आणि प्रसिद्ध प्रभात बॅण्ड, देवळणकर बंधूंचे नगारावादन, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पथकाने सादर केलेला जिवंत देखावा, कामायनी विद्यामंदिर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचे बॅण्ड पथक, टिपऱ्यांचा खेळ उपस्थितांचे प्रमुख आकर्षण ठरला.

तांबडी जोगेश्वरी

पुण्याचे ग्रामदैवत अशी ओळख असलेल्या तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला टिळक पुतळा येथून प्रारंभ झाला. मिरवणुकीत सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅण्डच्या बहारदार वादनाने उपस्थितांची मने जिंकली. शिवमुद्रा, ताल आणि शौर्य या ढोल-ताशा पथकांच्या वादनाने मिरवणुकीत आणलेली रंगत, घोडय़ावर विराजमान बाल शिवाजी ही वैशिष्टय़े असलेल्या मिरवणुकीचे अलका टॉकीज चौकात आगमन होताच भंडारा उधळीत येळकोट, येळकोट असा गजर करण्यात आला.

गुरुजी तालीम

गुलालाची मुक्त उधळण हे वैशिष्टय़ असलेल्या मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीमच्या मिरवणुकीला दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. सुभाष सरपाळे आणि स्वप्निल सपकाळे यांनी तयार केलेल्या आणि फुलांनी सजविलेल्या रथातून मूषकावर विराजमान असलेली विलोभनीय मूर्ती दुपारी एक वाजता बेलबाग चौकात आली. पंचवीस किलो चांदीच्या पालखीत पंचवीस किलो पंचधातूची असलेली गणेश मूर्ती हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. शिवगर्जना, नादब्रह्म, चेतक आदी ढोल-ताशा पथकांनी मिरवणुकीत रंगत आणली.

तुळशीबाग गणपती

वैविध्यपूर्ण फुलांची सजावट आणि गरुड रथात विराजमान, चांदीच्या दागिन्यांनी मढविलेली महागणपतीची मूर्ती हे तुळशीबाग गणपती मंडळाच्या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. लोणकर बंधूंचे नगरावादन, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी ढोल-ताशा पथकांनी सादर केलेले विविध ताल, शिवयोद्धा मर्दानी आखाडय़ाच्या मल्लांची लाठी-काठी, तलवारबाजीचे सादरीकरण मिरवणुकीदरम्यान करण्यात आले. ढोल-ताशा पथकांच्या वादनावर अनेक गणेशभक्तांनी ताल धरला.

केसरी वाडा गणपती

मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुकीस दुपारी एक वाजता प्रारंभ झाला. बेलबाग चौकामार्गे लक्ष्मी रस्त्याने विसर्जनासाठी हे मंडळ मार्गस्थ झाले. बिडवे बंधूंचे सनई-चौघडा वादन, पुणेरी पगडी धारण केलेल्या समर्थ पथकातील वादकांचा जल्लोष, मुलींची चित्तथरारक तलवारबाजीची प्रात्यक्षिके, शिवमुद्रा पथकाचे वादन, लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंदांच्या भेटीच्या ऐतिहासिक घटनेला सव्वाशे वर्ष पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर इतिहासप्रेमी मंडळाने सादर केलेला जिवंत देखावा हे या मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.