समाजातील काही व्यक्तींकडून रागाच्या भरात गुन्हा घडतो आणि त्या व्यक्तीला गुन्ह्याची शिक्षा देखील भोगावी लागते, ज्यानंतर त्या व्यक्तीला त्याचे आयुष्य कारागृहाच्या चार भिंतीत घालवण्याची वेळ येते. मात्र आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची संधी, मागील काही महिन्यापासून येरवडा कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना देण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर महिला कैद्यांसाठी गरबा या नृत्यप्रकाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिला कैद्यांनी गरबा खेळत आनंद साजरा केला.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीने श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक, सांस्कृतिक ट्रस्ट आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहा मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलिस महासंचालक कारागृह विभाग सुनील रामानंद, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यु टी पवार, महिला तुरुंग प्रमुख स्वाती पवार, अभिनेत्री पूजा पवार, आर जे शोनाली, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुनील रामानंद म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच असा उपक्रम घेण्यात आला. त्यामागे अनेक उद्देश होते, त्या सर्वात प्रथम महिला कैद्यांचा ताण-तणाव दूर करणे, त्यांच्यातील नैराश्य दूर करून त्यांचा उत्साह वाढविणे. हा प्रमुख उद्देश होता, समाजात आपले काय स्थान आहे. ते कसे उंचावता येईल आणि त्यांच्यामध्ये कौटुंबिक भावना निर्माण व्हावी, ही भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

‘पंखिडा’, ‘छो गाडा तारा’ या गाण्यावर महिला कैद्यांनी दांडियाचा फेर धरला

‘ओम गं गणपतये नम:’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात झाली़ ‘पंखिडा’, ‘छो गाडा तारा’ या गाण्यावर महिला कैद्यांनी गरबा नृत्य केलं. यावेळी महिला कैद्यांच्या हातातील टीपऱ्यांचा एकाच वेळी होणारा आवाज लक्ष वेधून घेत होता. या कार्यक्रमासाठी महिला कैद्यांनी दोन महिने रोज दोन तास सराव केला होता. यामध्ये 100 महिला कैद्यांनी सहभाग नोंदविला.