‘पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका’ अशा शब्दांत स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी मराठीची स्थिती मांडली होती. मात्र, आता पन्नाशीची उमर गाठलेल्या ‘पुरुषोत्तम’ च्या अभिवादनासाठी शनिवारी (१० मे)  जुन्या-नव्या रंगकर्मीचा मेळा भरतोय याचा आनंद होत आहे.. ज्येष्ठ रंगकर्मी-समीक्षक माधव वझे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत जणू सुवर्णक्षणांचे स्मरण केले.
पुरुषोत्तम वझे, प्रा. प्रभुदास भूपटकर आणि भगवान पंडित हे ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेचे संस्थापक. प्रमिला बेडेकर आणि राजा नातू यांनी त्यांना सहकार्य केले. कलोपासक संस्थेने १२ वर्षे आंतरशालेय नाटय़ स्पर्धा यशस्वी केल्या. पुढे जिल्हा परिषदेने आंतरशालेय नाटय़ स्पर्धा सुरू केल्यामुळे कलोपासकने या स्पर्धा थांबविल्या आणि त्याच्याऐवजी आंतरमहाविद्यालयीन नाटय़ स्पर्धा घेतली जावी, अशी पुरुषोत्तम वझे यांची म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा होती. याच कालखंडात त्यांचे निधन झाले. मात्र, अन्य संस्थापकांनी ५० वर्षांपूर्वी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू केली. एवढेच नव्हे तर त्याला माझ्या वडिलांचे पुरुषोत्तम करंडक हे नाव देऊन त्यांचे उचित स्मारक केले. या निमित्ताने गेल्या पाच दशकांत पुण्यामध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळ यशस्वी झाली याचा मला मनापासून अभिमान वाटतो, असेही माधव वझे यांनी सांगितले.
१० ऑगस्ट १९६३ रोजी भरत नाटय़ मंदिराचा पडदा उघडला गेला तोच मुळी विजय तेंडुलकर लिखित ‘बळी’ या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने सादर केलेल्या एकांकिकेने. जब्बार पटेल या विद्यार्थ्यांला दिग्दर्शनाचे तर, या एकांकिकेतील मुलीला अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा मी २३ वर्षांचा होतो. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यामुळे विद्यार्थी म्हणून अभिनय करू शकलो नाही याची रुखरुख असली तरी त्या काळी फग्र्युसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठ यांच्या एकांकिकांचा दिग्दर्शक म्हणून मी स्पर्धेमध्ये होतोच. मी फग्र्युसनचा विद्यार्थी असल्यामुळे प्राचार्य स. वा. कोगेकर, प्राचार्य बाळ गाडगीळ आणि प्रा. ग. प्र. प्रधान यांनी मला दिग्दर्शनासाठी बोलावून घेतले. सलग दोन वर्षे मला दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले होते. अर्थात अभिनेता म्हणून ‘पुरुषोत्तम’ च्या या रंगमंचावर माझा प्रवेश होऊ नाही हे खरे असले तरी ही उणीव माझा मुलगा अमित याने दूर केल्याचा आनंद आहे. स्पर्धेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत मी अंतिम फेरीचा परीक्षक होतो. या स्मरणिकेसाठी मी दोन लेख लिहिले होते, अशाही आठवणी माधव वझे यांनी सांगितल्या.
 
ढाल की करंडक
पुरुषोत्तम करंडक असा उल्लेख केला जातो खरा. पण, विजेत्या संघाला पारितोषिक म्हणून फिरती ढाल दिली जाते. ढाल हा शब्द गद्य वाटतो. पण, पारितोषिकामध्ये ढाल असली तरी आपण त्याला करंडक म्हणूयात असा निर्णय त्या वेळी संयोजकांनी घेतला. या ढालीवर असलेली मुखवटय़ाची दोन चित्रे प्रसिद्ध चित्रकार सुधाकर खासगीवाले यांनी दिली आहेत. त्याआधारे प्रदीप पानगंटी यांनी करंडकाची निर्मिती केली आहे.
विद्यार्थी प्रेक्षक पारितोषिक
स्पर्धेच्या सुरुवातीच्या वर्षांपासून विद्यार्थी प्रेक्षक पारितोषिक ठेवण्यात आले आहे. अंतिम फेरीच्या परीक्षकांनी दिलेल्या निर्णयाशी ज्या विद्यार्थ्यांचा निर्णय जुळतो त्याला हे पारितोषिक दिले जाते. विद्यार्थ्यांने केवळ आपल्याच नव्हे तर अन्य महाविद्यालयांच्या एकांकिका पाहून आपले मत बनवावे हा त्यामागचा उद्देश आहे. आतापर्यंत पाच-सहा विद्यार्थी या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत.
स्पर्धेची प्रतिष्ठा
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विजेत्या संघाला १०१ रुपये बक्षीस दिले जायचे. आता ५० वर्षांनंतरही पारितोषिकाच्या रकमेत फारशी भर पडलेली नाही. मात्र, स्पर्धेची प्रतिष्ठा अशी आहे की, विद्यार्थी पारितोषिकाच्या रकमेकडे पाहून काम करीत नाहीत. असा लौकिक ‘पुरुषोत्तम करंडका’ ला लाभला आहे.