उरुळी देवाची-फुरुसुंगी येथील ग्रामस्थ मागील १७ दिवसांपासून कचरा टाकू देत नाही. या प्रश्नावर अनेक वेळा बैठका झाल्या. मात्र सर्व बैठका निष्फळ ठरल्या. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्याकडे कचरा प्रश्न मांडला असता, पालकमंत्री, ग्रामस्थ आणि तुम्ही चर्चा प्रश्न सोडवा असे आदेश दिले होते. त्यावर आज पुण्यात एका कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट यांना कचरा प्रश्नाबाबत विचारले असता, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि प्रशासनासमावेत कचरा प्रश्नावर आज चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मागील १७ दिवसांपासून शहरातील कचरा उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोमध्ये ग्रामस्थ टाकून देण्यास ग्रामस्थ विरोध करत आहेत. हा कचरा प्रश्न मार्गी लागवा, यासाठी १७ दिवसांच्या कालावधीत कीर्तन, भजन, जागरण, गोंधळ अशा विविध मार्गांनी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थानी आज घंटानाद आंदोलन केले. महापौर आणि प्रशासनाच्या वतीने अनेकदा ग्रामस्थांसोबत बैठका घेण्यात आल्या. मात्र ग्रामस्थांचा विरोध पहिल्या दिवसापासून कायम असून ‘तुमचा कचरा येथे टाकू देणार नाही, कचरा डेपो बंद करा,’ या भूमिकेवर ग्रामस्थ अद्याप ठाम आहेत.

महापौर मुक्ता टिळक यांनी पिंपरी येथील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्याकडे कचरा प्रश्न मांडला होता. त्यावेळी पालकमंत्री, ग्रामस्थ आणि तुम्ही चर्चा प्रश्न सोडवा, असे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर पालकमंत्र्याकडून कोणत्याही प्रकारची भूमिका किंवा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शहरातील कचरा पेट्या भरुन वाहत आहेत.