पुणे : केंद्र सरकारने संयुक्त अरब अमिरातीला दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या (एनसीईएल) माध्यमातून होणार आहे.

परदेशी व्यापार विभागाने बुधवारी या बाबतची अधिसूचना काढली आहे. उभय देशातील मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने केलेल्या विनंतीनुसार दहा लाख टन कांद्याची निर्यात करण्यात येणार आहे. निर्यातीत होणारा गोंधळ आणि अनियमितता टाळण्यासाठी ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड, या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

हेही वाचा – हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

राज्यात आता उन्हाळी कांद्याची काढणी सुरू झाली आहे. उन्हाळी कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने निर्यातीसाठीच घेतले जाते. पण, देशातून निर्यात बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लासलगाव बाजार समितीत बुधवारी कांद्याचे दर प्रती क्विंटल ११०० ते १४०० रुपये इतके होते. काढणीचा वेग वाढून आवक वाढली की दरात आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. निर्यातबंदी नसती तर सध्या कांद्याचा दर सरासरी तीन हजार रुपये क्विंटलवर गेला असता, अशी माहिती सिन्नर येथील कांदा उत्पादक अमोल मुळे यांनी दिली.

हेही वाचा – केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

कांदा निर्यातीची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडने (एनसीईएल) कुणाकडून किती दराने कांदा खरेदी केला, याची माहिती जाहीर करण्याची मागणी आतिष बोराटे यांनी केली आहे.