घराघरांमधील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामांमध्ये मदत करण्याचे काम एका संस्थेतर्फे केले जाते. या कामात तरुणाईचा मोठा सहभाग आहे आणि समाजमाध्यमांचा चांगला उपयोग या कामासाठी झाला आहे.

आर्थिक स्थिती चांगली आहे, परंतु सोबत नाही, अशी अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची स्थिती आहे. निरनिराळ्या कारणांमुळे परावलंबी बनलेल्या अशा आजी -आजोबांना मदतीचा हात देऊन माणुसकीचा ओलावा जपण्यासाठी आणि त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी ‘माया केअर सेंटर’  असा एक उपक्रम चालवला जातो. समाजमाध्यमांचा वापर करत या उपक्रमाने एक पाऊल टाकले आहे.

वय वाढत जाते आणि हालचाली मंदावतात, अशा वेळी दैनंदिन कामे करण्यासाठी देखील ज्येष्ठांना मदतीची गरज भासू लागते. बँकेची कामे करणे, डॉक्टरकडे जाणे, वस्तू, भाजी, औषधे,फळे आणणे, वाचन- लेखन करणे अशा अनेक कामांना ज्येष्ठांना मदतनिसाची गरज लागते. त्यांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना सेवा पुरविण्यच्या हेतूने माया केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. आजी आजोबांना पुरविण्यात येणारी ही सेवा विनामूल्य आहे. संस्थेचे खास वैशिष्टय़  म्हणजे आजी-आजोबांना मदतीचा हात देण्यात सर्वात जास्त पुढाकार तरुणाईचा आहे.

संस्थेच्या ज्योती मोरे म्हणाल्या,की आजकाल तरुण पिढीकडे समाजमाध्यमांच्या आहारी गेलेली पिढी म्हणून  बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आहे. परंतु फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून तरुण पिढी खरेच समाजासाठी चांगले काम करत आहे. तरुण मुलांचे उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे, तिथेच स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले तसे वृद्धत्वाकडे झुकलेल्या त्यांच्या आईवडिलांच्या एकटे राहण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही समस्या लक्षात घेऊन माया केअर सेंटरची स्थापना डॉ. विद्या गोखले यांनी सन २००९ साली केली.

संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठांना फक्त मदत करणे एवढेच काम नव्हे, तर संस्थेतर्फे ज्येष्ठांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही केले जातात. विविध गीतांचे कार्यक्रम सादर केले जातात.  ज्येष्ठ नागरिकांना वाचन, लिखाणाची आवड जपता यावी म्हणून स्वयंसेवकांकडून मदत केली जाते. संस्थेकडे मदतीसाठी दिवसातून ३ ते ४ फोन येतात. व्हॅटसअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, महिला, सेवानिवृत्त व्यक्ती संस्थेचे स्वयंसेवक होण्यासाठी इच्छुक असतात. समाज माध्यमांमुळे संस्थेच्या स्वयंसेवक संख्येत भर पडली आहे. सध्या संस्थेमध्ये ५० ते ७० स्वयंसेवक काम करत आहेत. समाजमाध्यमांच्या वापरामुळे संस्थेचा प्रसार होण्यास नक्कीच मदत झाली आहे आणि त्याबरोबर लोकांमध्ये जागृती झाली आहे. आजी आजोबांसाठी काम केल्यानंतर तरुणाईचा दृष्टिकोन बदलला असून त्यांच्यात मदत केल्यानंतर समाधानाची भावना जोपासली जात आहे. त्यात अर्धवेळ काम करणाऱ्यांची, सुटीच्या दिवशी काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

घरात सारे काही असते, मात्र काळजी घेणारी मुले कामासाठी दूर गेलेली असतात. अशावेळी आजी-आजोबांना मदतीची गरज असते. अनेक घरांमध्ये सत्तरी उलटलेली ज्येष्ठ मंडळी राहतात. लहानसहान कामे करण्यासाठी जिने चढणे-उतरणे त्यांना जमत नाही. पण आठवडय़ाची भाजी, महिन्याची बँकेची कामे करण्याला पर्याय नसतो. या वेळी मदतीला येते ते माया केअर सेंटर. विजेची बिले, टेलिफोन बिले, मोबाईल बिले भरणे अशा प्रकारच्या सेवा संस्थेकडून दिल्या जातात.  आजी-आजोबांना पुस्तकेदेखील वाचून दाखवली जातात. पारपत्र काढण्यासाठी मदत केली जाते. त्यांना फिरायला घेऊन जाणे, त्यांची काळजी घेणे, परदेशात कुरिअर पाठवणे यासारखी अनेक कामे संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य केली जातात. संस्थेच्या अधिक माहितीसाठी ९५५२५१०४०० किंवा ९५५२५१०४११ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.