शहरात तापमानातील वाढ सुरूच असून, पाऱ्याने पुन्हा एकदा चाळिशी ओलांडली. पुणे वेधशाळेत सोमवारी ४०.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. वाढलेल्या उकाडय़ाच्या झळा सध्या बसत असल्या तरी येत्या चोवीस तासांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.
नैर्ऋत्य मान्सून सध्या केरळच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. इकडे देशात मात्र उष्णतेच्या लाटेने लोकांना त्रस्त केले आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानात वाढ होत आहे. शहर, उपनगरे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारी सकाळी नऊ-दहा वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवायला सुरुवात झाली. वाढते तापमान आणि त्यातच हवेतील आद्र्रताही कमी झाल्यामुळे उन्हाचा चटका जाणवत होता. तापमानाने दुपारी कमाल ४० अंशांचा टप्पा ओलांडला. उन्हाच्या झळांमुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे रस्त्यावर तुलनेने कमी गर्दी दिसत होती. शहरात गेले काही दिवस ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला होता. आता तापमानाने चाळिशी पार केल्यामुळे तीच स्थिती काय आहे.
वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत हवामानात बदल अपेक्षित आहेत. तापमानामुळे स्थानिक पातळीवर ढग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारनंतर ढगांच्या गडगटाडात पाऊस अपेक्षित आहे.