शहर सुधारणा समितीमध्ये प्रस्तावाला मंजुरी; सहा हजार कोटींचा प्रकल्प

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या आणि गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या उच्च क्षमता द्रुतगती मार्गाच्या (हाय कपॅसिटी मास्ट ट्रान्झिट रूट-एचसीएमटीआर) प्रस्तावाला महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने बुधवारी मान्यता दिली. तब्बल सहा हजार ६४६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून प्रकल्प खर्च उभारणीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, हा मार्ग पूर्णपणे उन्नत (एलिव्हेटेड) राहणार असून आराखडय़ातील प्रस्तावित मार्गाची रचना बदलण्यात आली असून मार्गाची लांबी काही प्रमाणात वाढली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने तीस वर्षांपूर्वी मध्यवर्ती भागातून ३४ किलोमीटर लांब आणि २४ मीटर रुंद वर्तुळाकार मार्ग प्रस्तावित केला होता. शहरातील साठ प्रमुख रस्ते या मार्गाने जोडण्याचे नियोजनही करण्यात आले होते. शहराच्या जुन्या हद्दीच्या प्रारूप विकास आराखडय़ातही हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र या रस्त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रशासकीय पातळीवर होत नव्हती. या संदर्भात ‘स्तूप’ या कंपनीची सल्लागार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. या संदर्भातील प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता.

गेल्या बैठकीत त्याचे सादरीकरणही करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत यांनी दिली.

‘प्रकल्पाचा मूळ खर्च ५ हजार ९६ कोटी आणि भूसंपादनासाठी १ हजार ५५० कोटी असे एकूण ६ हजार ६४६ कोटी रुपये या प्रकल्पासाठी आवश्यक आहेत. या प्रकल्पाचा खर्च उभारणीसाठी विविध प्रकारची पीपीपी मॉडेल्स अभ्यासण्यात आली आहेत.

त्यामुळे प्रकल्पाची रक्कम कशी उभारायची या संदर्भात सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाबरोबर पत्रव्यवहार करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले असून मुख्य सभेला हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याशिवाय केंद शासन  आणि राज्य शासनाकडून काही आर्थिक मदत होण्यासंदर्भातही प्रयत्न करण्यात येतील,’ असे लडकत यांनी यावेळी सांगितले. प्रकल्पाचा मूळ खर्च ५ हजार ९६ कोटी रुपये एवढा आहे.

प्रस्तावित मार्ग

बोपोडी, पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्ता, पौड फाटा, कर्वे रस्ता, दत्तवाडी, सारसबाग, स्वारगेट, नेहरू रस्ता, लुल्लानगर, वानवडी, रामवाडी, मुंढवा, वडगावशेरी, विमाननगर चौक आणि विश्रांतवाडी असा हा वर्तुळाकर मार्ग असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित धरण्यात आला आहे.

असे करावे लागेल भूसंपादन

  • महापालिकेच्या ताब्यातील जागा- १७.१४ किलोमीटर (४४ टक्के)
  • खासगी जागा- १२.५७ किलोमीटर (३५.५१ टक्के)
  • सरकारी जागा- ८.९३ किलोमीटर (२०.१५ टक्के) असा आहे एचसीएमटीआर

हा रस्ता ३५.९६ किलोमीटर लांबीचा असून तो उन्नत (इलेव्हेटेड) असणार आहे. रस्त्याची रुंदी चोवीस मीटर असून त्यावर सहा मार्गिका (लेन) असतील. त्यापैकी दोन मार्गिका या बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाना जोडला जाणार असून बीआरटीसाठी २८ स्थानके या मार्गात असतील. यांत्रिक जिन्यांची (एलेव्हेटर्स) सुविधाही पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढील चाळीस वर्षांत वाहतुकीत होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे.