पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती असल्याने शुक्रवारी (२१ मे) ते अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ आणि त्यापाठोपाठ बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याचे संकेत असलेल्या चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोसमी वारे अंदमानात २१ मे रोजी दाखल होतील, असा अंदाज तौक्ते चक्रीवादळाच्या काळातच हवामान विभागाने जाहीर केला होता. त्याचप्रमाणे त्यांचे केरळमधील आगमनही नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधी म्हणजे ३१ मे रोजी होणार असल्याचा सुधारित अंदाजही हवामान विभागाने जाहीर केला आहे.

वादळभान…

बंगालच्या उपसागरामध्ये २२ मे रोजी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. हे क्षेत्र तीव्र होऊन २४ मेपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकत जाईल.