राजकीय कृपादृष्टी आणि पोलिसांच्या हप्तेगिरीमुळे भोसरीतील बालाजीनगर परिसरात अवैध दारूधंदे राजरोस सुरूच होते. सातत्याने तक्रार, अर्ज, विनंत्या करूनही ते बंद न झाल्याने येथील महिलांनी गुरुवारी आंदोलन करून सर्व दारूधंदे बंद पाडले. जवळपास चार तास हे आंदोलन सुरू होते. यापुढे हा परिसर ‘दारूमुक्त’ राहील, असा निर्धार आंदोलक महिलांनी केला. मात्र, बंद झालेले धंदे जादा हप्ते घेऊन पोलिसांनी पुन्हा सुरू करू नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात राजरोसपणे दारूधंदे सुरू होते. त्याचा परिसरातील नागरिक विशेषत: महिलांना भयानक त्रास होत होता. हे धंदे बंद करण्याची मागणी सातत्याने करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. पोलिसांना हप्ते मिळत होते आणि राजकीय नेत्यांचे समर्थन धंदेवाल्यांना होते. त्यामुळे नागरिकांना ते जुमानत नव्हते. अखेर, गुरुवारी स्थानिक नगरसेविका सीमा सावळे यांच्या नेतृत्वाखाली दोनशे महिला एकत्र जमल्या. सर्वप्रथम त्यांनी घरगुती अड्डय़ांवर मोर्चा वळवला. त्यानंतर, सर्वच दारूधंदे बंद केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी ठाण्याचे पोलीस तेथे आले. महिलांचा आक्रमक अवतार पाहून पोलिसांनीही दारू धंद्यांविरुद्ध छापे मारण्यास सुरुवात केली. महिलांचे आंदोलन आणि पोलिसांचे छापे याबाबतची आगाऊ माहिती धंदेचालकांना होती, त्यामुळे त्यांनी आपले दारूसाठे अन्यत्र हलवले होते. मात्र, तरीही यापुढे कोणत्याही परिस्थितीत येथे दारूविक्री होऊ देणार नाही, असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.