पुणे : संगणक अभियंता मुलाने वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील एका सोसायटीत घडली. आईचा खून करून संगणक अभियंता मुलगा पसार झाला असून, त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. संगणक अभियंता तरुणाने दारुच्या व्यसनासाठी आईचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

लता आल्फ्रेड बेंझमिन (वय ७३, रा. कुबेरा गार्डन सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लता यांचा मुलगा मिलिंद (वय ४३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद पसार झाला आहे. याबाबत मिलिंदचा मोठी बहीण डॉर्थी मोजेस पनमोजेस (वय ४९, रा. सोलेस पार्क, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉर्थी शिक्षिका आहेत. लता यांच्या पतीचे वीस वर्षांपूर्वी निधन झाले होते. लता यांच्या मुली सुश्मिता आणि डॉर्थी विवाहित आहेत. लता आणि त्यांचा मुलगा मिलिंद एनआयबीएम रस्त्यावरील कुबेरा गार्डन सोसायटीत राहायला आहेत. मिलिंद संगणक अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा…Porsche Accident:”पोर्श प्रकरणात आमदाराच्या मुलाचा समावेश, पब पार्टीनंतर रेस..”, नाना पटोलेंचा आरोप

मिलिंद बंगळुरूतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला होता. करोना संसर्गात त्याची नोकरी गेली. त्यानंतर तो परत पुण्यात आला. तीन वर्षांपासून तो बेकार होता. नोकरी गेल्यानंतर तो दारुच्या आहारी गेला होता. त्याचा आईशी नेहमी वाद व्हायचा. निवृत्तीनंतर लता एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या वेतनातून घरातील खर्च भागवला जायचा. २६ मे रोजी डॉर्थी यांनी आईशी संपर्क साधला. त्यानंतर तीन दिवस संपर्क न झाल्याने मंगळवारी (२८ मे) सायंकाळी लता यांच्या सदनिकेतून कुबट वास येत असल्याची माहिती रहिवाशांनी डॉर्थी आणि त्यांची बहीण सुश्मिता यांना दिली. त्यानंतर रात्री डॉर्थी, सुश्मिता सदनिकेत गेले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेव्हा प्रसधानगृहातील दरवाज्यावर मिलिंदने ‘मॉम इज इनसाइड डोन्ट गो’ असे लिहिले होते. प्रसाधनगृहाचा दरवाजा उघडल्यानंतर लता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे उघडकीस आले. मिलिंद आईचा मोबाइल संच घेऊन घरातून पसार झाल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा…पुणे : भांडारकर रस्त्यावर इमारतीच्या गच्चीवर आग

या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण तपास करत असून, पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.