पुणे : सन २०१४ मध्ये काँग्रेसच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परस्पर आधीच उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली, हे पाप पृथ्वीराज चव्हाण यांचे असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बुधवारी केला. बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ येतो. मात्र, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभेला मदत केल्यास लोकसभेला मदत करण्याबाबत भूमिका घेतली आहे.

हेही वाचा : सुनील तटकरे स्पष्टच बोलले, “सुनेत्रा पवारच बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार”

या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले, की हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत भाष्य केलेले नाही. तरीदेखील याची पक्षात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढविली. हे पाप चव्हाण यांचे आहे. त्या निवडणुकीत इंदापुरातून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे निवडून आले. त्यानंतर पाटील यांच्याबाबत आघाडी म्हणून पक्षात विचार सुरू असतानाच ते भाजपात गेले आणि पुन्हा २०१९ मध्ये भरणे तेथून निवडून आले. मात्र, आता भाजप आणि आम्ही महायुतीत असल्याने काहीतरी तोडगा नक्कीच काढू. माझे बंधू २०१४ पासून माझ्यासोबत नाहीत. त्यामुळे ते आता सोडून गेले, अशी चर्चा घडविली जात आहे. मात्र, त्यात तथ्य नाही. राजकारणामुळे कुटुंबात फूट पडल्याचे भारतीय राजकारणात नवीन नाही. त्यामुळे बंधू सोडून जाणे हे नव्यानेच घडलेले नाही.