ढाक्यातील शरणागती (१९७१ चे भारत-पाक युद्ध आणि बांगला देशाची निर्मिती).. लालबहादूर शास्त्री यांचे निधनापूर्वीचे ताश्कंद येथील अखेरचे छायाचित्र.. जेआरडी टाटा यांचे विमान उड्डाण.. टेल्कोमधील जेआरडी टाटा.. गंगा नदीतील इंडो-न्यूझीलंड जेट बोट.. भारतीय पगडीतील सर एडमंड हिलरी.. ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण..  भारतीय लष्कराला चीनच्या लष्कराने दिलेली भेट.. अशा स्वातंत्र्योत्तर काळातील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन सोमवारपासून (६ जून) भरविण्यात येत आहे.

प्रसिद्ध लघुपट निर्माते (डॉक्युमेंटरी फिल्ममेकर) (कै.) प्रेम वैद्य यांच्या संग्रहातील दुर्मीळ छायाचित्रांचे ‘सिंग्युलर मूमेंट्स इन हिस्टरी’ हे छायाचित्र प्रदर्शन भोसलेनगर येथील इंडिया आर्ट गॅलरी येथे भरविण्यात येणार आहे. ‘विसरू नये असे काही’ अशा वर्गातील ही दुर्मीळ छायाचित्रे स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाशझोत टाकणारी आहेत. प्रेम वैद्य यांचे पुत्र व ज्येष्ठ पत्रकार अभय वैद्य आणि इंडिया आर्ट गॅलरीचे संचालक मििलद साठे यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. १६ जूनपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन सर्वासाठी विनामूल्य खुले राहणार आहे.