scorecardresearch

पोलीस ठाण्यात भाडेकरूंची माहिती देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट

घरमालक आणि भाडेकरू यांच्यात ऑनलाइन भाडेकरार (लिव्ह अण्ड लायसन्स) झाल्यानंतर घरमालकांनी पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन माहिती देण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाइन कराराबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आदेश

पुणे : घरमालक आणि भाडेकरू यांच्यात ऑनलाइन भाडेकरार (लिव्ह अॅण्ड लायसन्स) झाल्यानंतर घरमालकांनी पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन माहिती देण्याची आवश्यकता नाही. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे भाडेकरार नोंदविल्यानंतर त्याची माहिती क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्र्रँकग नेटवर्क आणि सिस्टीम्स (सीसीटीएनएस) या संगणकीय प्रणालीद्वारे पोलिसांना ऑनलाईन मिळत असल्याने नागरिकांना पोलिस ठाण्यात येऊन माहिती देण्याची सक्ती करू नये, असे स्पष्ट आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. याबाबतचे परिपत्रकही प्रसृत करण्यात आले आहेत.

शंभर किंवा पाचशे रूपयांच्या मुद्रांकावरील भाडेकरार आता कालबाह्य झाले असून असे करार कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. त्याऐवजी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंदवण्यात येणारे ऑनलाइन भाडेकरारच कायदेशीर करण्यात आले आहेत. मात्र, याबाबत अद्यापही जनजागृती झाली नसल्याने ऑनलाइन भाडेकरार करण्यात आला असतानाही नागरिकांनी त्याबाबतची माहिती प्रत्यक्ष पोलिस ठाण्यामध्ये येऊन देण्याची सक्ती करण्यात येत आहे. याबाबत पुण्यातील हडपसर भागातील मकरध्वज काशीद यांनी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके आणि पोलीस महासंचालक कार्यालयातील उपसहायक श्री. चं. इमडे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता ऑनलाइन भाडेकरार करण्यात आल्यावर प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाऊन माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस विभाग आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यांच्या वतीने ‘आय सरिता’ प्रणालीद्वारे ऑनलाइन भाडेकराराची माहिती ही सीसीटीएनएस संगणकप्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संगणकप्रणालीमध्ये सिटीझन पोर्टलअंतर्गत भाडेकरूंची माहिती भरण्याची सुविधा आहे. घरमालकांनी भाडेकरुंची माहिती पोलीस ठाण्यामध्ये ऑनलाइन कळविणे आवश्यक आहे. मात्र, सीसीटीएनएसमध्ये घरमालक आणि भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यांमध्ये पाहता येते. पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीत राहणारे घरमालक आणि भाडेकरू यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे घरमालकांना भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात, तर भाडेकरूंनी गृहनिर्माण संस्थांना पोलीस पडताळणीची गरज नसल्याचे या परिपत्रकामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

घरमालक आणि भाडेकरूंना दिलासा

ऑनलाइन भाडेकरार करण्यात आला असतानाही पोलिसांकडून नागरिकांना पोलिस ठाण्यामध्ये येऊन माहिती देण्याची सक्ती करण्यात येत होती. या आदेशांमुळे आता ऑनलाइन भाडेकरार झाला असल्यास नागरिकांना पोलिस ठाण्यात जाऊन माहिती देण्याची गरज राहणार नाही. तसेच भाडेकरूंना स्वतंत्र पोलीस पडताळणीची गरज नाही. याबाबत संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. पोलीस महासंचालक कार्यालयाने प्रसृत केलेल्या परिपत्रकामुळे घरमालक आणि भाडेकरू दोन्ही घटकांना दिलासा मिळेल, असे असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information tenants police station ysh

ताज्या बातम्या