पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह कारागृहातील रक्षकासह समुपदेशकाला गुन्हे शाखेने अटक केली.ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय ५७, रा. रक्षकनगर, खडकी) याच्यासह कारागृह रक्षक मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड), समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय ४४) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. इंगळे याला मंगळवारी रात्री उशीरा गुन्हे शाखेने अटक केली. शेवते आणि शेख यांना अटक करुन मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. ललित पाटील ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत होता. २ ऑक्टोबर रोजी तो बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. त्यादिवशी कारागृह रक्षक शेख वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये बंदोबस्तात होता. शेखने ललितला पसार होण्यास मदत केल्याचे तपासात उघडकीस झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. शेवते ॲड. प्रज्ञा कांबळे, अभिषेक बलकवडे, विनय आरहाना यांच्या संपर्कात होता. शेख याचा मोबाइल संच वापरुन ललितने कांबळे, बलकवडे, आरहाना यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर तो ससून रूग्णालयातून पसार झाला. याप्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठ़डी देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. मंजुश्री इथापे-यादव यांनी युक्तीवादात न्यायालयाकडे केली. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी शेवते आणि शेख यांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेने कारागृहातील समुपदेशक इंगळे याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा