या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये मुंबई-पुण्यातील नोकरीच्या संधींमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट झाली असल्याचे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज (असोचेम) या संस्थेने केलेल्या पाहाणीमधून समोर आले आहे.
विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या जाहिराती, राष्ट्रीय आणि स्थानिक वृत्तपत्रातून येणाऱ्या जाहिराती यांची रोज पाहणी करून त्या माध्यमातून असोचेमने हे निष्कर्ष काढले आहेत. देशातील ५६ शहरे आणि १७ (सेक्टर) याची पाहणी असोचेमने केली आहे. या पाहणीच्या निष्कर्षांनुसार यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये मुंबई-पुण्यामध्ये नोकरीच्या नव्या संधी घटल्या आहेत. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत मुंबईमध्ये २८ टक्क्य़ांनी घट झाली आहे, तर पुण्यात १७ टक्क्य़ांनी घट झाली आहे. मात्र, नागपूरमध्ये २७ टक्क्य़ांनी नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
देशभरामध्ये नोकरीच्या संधींमध्ये २ टक्क्य़ांची घट झाली असल्याचे असोचेमने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या संधीपैकी माहिती-तंत्रज्ञान, हार्डवेअर या क्षेत्रातील संधी अधिक आहेत. मात्र, बांधकाम, अभियांत्रिकी, वाहन, पायाभूत सुविधा निर्मिती, मनुष्यबळ, उत्पादन, विक्री, टेलेकॉम, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांमधील नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. भारतातील इतर शहरांपैकी दिल्लीमध्ये १६ टक्के, कोलकातामध्ये १९ टक्के बंगळुरूमध्ये ७ टक्के वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये नोकरीच्या संधींमध्ये २१ टक्क्य़ांनी घट झाल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jobs opportunity decrease in pune mumbai
First published on: 04-07-2013 at 02:38 IST