रस्ते सुरक्षेबाबत वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात गेल्या चार महिन्यात ५८ महाविद्यालयातील १३ हजार युवकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले. यापुढील काळात वाहतूक पोलिसांकडून महाविद्यालयीन पातळीवर जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन कार्यक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक नियम पाळणे, अपघातग्रस्तांना मदत, स्वयंशिस्त याबाबत वाहतूक पोलिसांकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. बेजबाबदारपणे वाहन चालविल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. कारवाई करुन अपघातांचे प्रमाण कमी करणे शक्य नाही. समुपदेशनाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिक तसेच महाविद्यालयीन युवकांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती दिल्यास अपघातांची संख्या कमी होईल, या विचारातून वाहतूक पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जुलै २०१९ पासून वाहतूक पोलिसांच्या समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून शहर परिसरातील महाविद्यालयांमध्ये समुपदेशन कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत मॉडर्न, फग्र्युसन, स. प. महाविद्यालय, मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालयासह शहरातील अन्य प्रमुख महाविद्यालयांमध्ये समुपदेशन कार्यक्रम राबाविले आहेत. या कार्यक्रमात वैद्यकीय तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी होतात. जुलै ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक आणि कर्मचारी विविध महाविद्यालयात जाऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

महाविद्यालयीन युवकांना रस्ता सुरक्षा तसेच वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देण्याचे काम करण्यात येत आहे. महाविद्यालयीन प्रशासनाने पोलिसांना चांगले सहकार्य केले आहे. या पुढील काळात समुपदेशन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

– राजेश पुराणिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग.