स्वत:च्या क्षमतांचा सर्वोच्च विकास हेच खरे करिअर, असा सूर करिअर निवड व ताण व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या चर्चेत मंगळवारी व्यक्त झाला. निमित्त होते ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाचे. योग्य करिअर कसे निवडावे, करिअरच्या विविध संधी कोणत्या, तसेच दहावी-बारावीपासूनच ताणाचे व्यवस्थापन कसे करावे, या विषयी प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके आणि करिअर समुपदेशक नीलिमा आपटे यांनी या वेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
‘एसआरएम युनिव्हर्सिटी’ प्रस्तुत या कार्यक्रमासाठी ‘रोबोमेट’ ही संस्था सहप्रायोजक होती. एसआरएम विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक अशोक कुमार व एज्युकेअर लिमिटेडचे शैक्षणिक विभाग प्रमुख व्ॉलेरिअन सिंग्बल या वेळी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले.
दहावीला किती टक्के गुण मिळतात यावर पुढे काय करायचे हे ठरवणे ही करिअर निवडीची अत्यंत अशास्त्रीय पद्धत आहे, असे वेलणकर यांनी सांगितले. ते म्हणाले,‘दहावीच्या गुणांची टक्केवारी दरवर्षी अधिकाधिक वाढत आहे. या टक्केवारीवरुन पुढील शिक्षणशाखा निवडणे योग्य नाही. केवळ मित्रांच्या गटाने ठरवले म्हणूनही काही विद्यार्थी विशिष्ट शिक्षणशाखेस जातात. हेही धोक्याचे आहे. त्यामुळे कलचाचणी आवश्यक असून त्यात आपल्याकडे ज्या क्षमता कमी आहेत असे कळते त्यांच्याशी निगडित शाखा निवडताना पुनर्विचार करावा. आपल्याला खूप आवडलेले, जमलेले व झेपलेले विषय तसेच मध्यम व कमी आवडलेले व जमलेले विषय यांची यादी करावी. ’
डॉ. लुकतुके  म्हणाले,‘‘ताण संतुलित प्रमाणात वाढवल्यास अभ्यासातले वा कामातले यश वाढते, परंतु तो प्रमाणाबाहेर वाढल्यास अपेक्षित यश मिळत नाही. अभ्यासात मुलांचे लक्ष न लागणे, वर्गात बसावेसे न वाटणे, लक्षात न राहणे हे ताणाचे निदर्शन असून ती पालकांसाठी जागे होण्याची पहिली पायरी असते. शिक्षण व करिअरमधील यशासाठी अभ्यासपूर्ण जोखीम घेण्याची तयारी हे महत्वाचे तत्त्व असून या प्रक्रियेशी विद्यार्थ्यांची ओळख करुन देणे व त्या प्रवासात त्याच्या बरोबर उभे राहणे हे सुजाण पालकत्व आहे.’’
‘‘जे क्षेत्र निवडावेसे वाटते त्यातील किमान तीन अनुभवी व्यक्तींशी सविस्तर बोलून त्या क्षेत्रातील खाचखळगे जाणून घ्या,’’ असे आपटे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘करिअर निवडीसाठीच्या कलचाचणीत गुण मोजले जात नसून त्यातून केवळ विद्यार्थ्यांच्या क्षमतांची पातळी सांगितली जाते. मनापासून प्रयत्न केल्यास या क्षमता वाढवता येतात.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta maarg yashacha career guidance discusion
First published on: 09-12-2015 at 03:36 IST