लोणावळा येथे सहा वर्षांच्या कुत्र्याला जीवे मारल्याच्या संशयावरून अभिनेत्री आयशा समीर वशी यांनी केअरटेकर राम आंद्रे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. यावरून लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम आंद्रे हा आयशा यांच्या बंगल्यावर केअरटेकर म्हणून आहे. आयशा यांनी त्यांच्या बंगल्यावर दोन कुत्र्याची पिल्लं आणली होती. त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी राम आंद्रेवर होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुंगार्ली येथे अभिनेत्री आयशा यांचा बंगला आहे. त्यांनी हिंदीसह अनेक भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. सहा वर्षांपूर्वी आयशा यांनी त्यांच्या बंगल्यावर दोन कुत्र्यांची पिल्ले आणली होती. केअर टेकर राम आंद्रे हा दोन्ही कुत्र्यांचा सांभाळ करायचा. यापैकी, एका कुत्र्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे आयशा यांना राम आंद्रे याने फोन करून सांगितले. मात्र, कुत्र्याच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याने खासगी डॉक्टरांच्या मार्फत मृत्यू झालेल्या कुत्र्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात संशयास्पद आढळल्याने केअर टेकर राम आंद्रे याला विचारणा करण्यात आली.

तेव्हा, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे  संशय बळावल्यावने आयशा यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात राम आंद्रे विरोधात फिर्याद दिली असून, केअर टेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम याचा मृत्यू झालेल्या कुत्र्यावर राग होता. असं पोलिसांनी सांगितले असून घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव हे करत आहेत.