राष्ट्रवादीच्या आंदोलक कार्यकर्त्यांची पोलिसांशी वादावादी

राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविषयी भगवानगडावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर गुरुवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी पिंपरीत येणार होते. तथापि, राज्यभरात तापलेले वातावरण व शहर राष्ट्रवादीने दिलेला काळे फासण्याचा इशारा, यामुळे जानकर मेळाव्याकडे फिरकले नाहीत. आंदोलनासाठी आलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिसांशी या वेळी जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा रहाटणीतील ‘थोपटे लॉन्स’ येथे होणार होता. ‘चलो पिंपरी-चिंचवड’ असे फलक पक्षाच्या वतीने जागोजागी लावण्यात आले होते. सकाळी अकरापासून सुरू होणाऱ्या या मेळाव्यात जानकर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. दुपारी एकपर्यंत ते पोहोचतील, असा निरोप होता. प्रत्यक्षात ते मेळाव्याला आलेच नाहीत. जानकर येणार म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी जमा झाले होते. जानकर यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना नोटिसा बजावल्या होत्या, मात्र तरीही कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले. कोकणे चौकात थांबलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, दोहोंमध्ये बरीच वादावादी झाली, काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर, वाकड पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.  दरम्यान, महादेव जानकर हे मेळाव्यासाठी येणारच नव्हते, असा दावा ‘रासप’च्या वतीने करण्यात आला. राष्ट्रवादीने काळे फासण्याचा इशारा दिला म्हणून घाबरून ते आले नाहीत, असे काहीही नाही. लवकरच रासपच्या वतीने जानकर यांची जाहीर सभा घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.