पुणे : राज्यातील शाळांना २ मे ते १२ जून या कालावधीत उन्हाळी सुटी जाहीर करण्यात यावी. तर आगामी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांतील शाळा १३ जूनपासून, तर विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवला आहे.

करोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वीच घेतला. त्यानंतर उन्हाळी सुटी कधी सुरू होणार असा प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता येण्यासाठी शासन स्तरावरून निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर म्हणाले, अद्याप करोनाची परिस्थिती असल्याने उन्हाळी सुटी आणि शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. आता त्याबाबत शासनाकडून निर्णय घेतला जाईल.