Premium

‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ संकेतस्थळावरील विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्राची आघाडी, देशभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांचे श्रेयांक साठवण्यासाठी विकसित केलेल्या ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटवर सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्रातून झाली आहे.

Academic Bank of Credit website
‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ संकेतस्थळावरील विद्यार्थी नोंदणीत महाराष्ट्राची आघाडी, देशभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांचे श्रेयांक साठवण्यासाठी विकसित केलेल्या ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटवर सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्रातून झाली आहे. राज्यातील १८६ शिक्षण संस्थांनी नोंदणी केली असून, देशभरातील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची संकेतस्थळावर नोंदणी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक प्रक्रिया लवचिक आणि विद्यार्थिकेंद्री करण्यावर धोरणात भर देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांचे श्रेयांक साठवण्यासाठी ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश यूजीसीने देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. देशभरातील १ हजार ६०५ विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था संकेतस्थळावर नोंदणीकृत झाल्या आहेत. त्यात ११७ केंद्रीय संस्था, ३३५ स्वायत्त महाविद्यालये, ५२ केंद्रीय विद्यापीठे, ३८८ खासगी विद्यापीठे, ३८४ राज्य विद्यापीठे, ११८ अभिमत विद्यापीठे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेशी संलग्न ११८९ संस्था, अन्य २२ संस्थांचा समावेश आहे.

हेही वाचा – पुण्यात होणार २९ आरोग्यवर्धिनी केंद्र; केंद्र सरकारकडून ६ कोटींचा निधी प्राप्त

संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार सर्वाधिक १८६ संस्था महाराष्ट्रातील आहेत. त्या खालोखाल तमिळनाडूतील १३२, आंध्र प्रदेशातील ११९, मध्य प्रदेशातील ११२, उत्तर प्रदेशातील १०९, गुजरातमधील १०६ संस्थांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी नोंदणीत आघाडी घेतली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ६ लाख ११ हजार ८२२, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ५ लाख ४७ हजार २३७ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. स्कील इंडिया डिजिटलने देशात सर्वाधिक ४४ लाख ३३ हजार ६५० विद्यार्थ्यांची नोंदणी केल्याचे दिसून येते.

हेही वाचा – येरवडा, मुंढवा, कोरेगाव पार्क भागात जड वाहनांना मनाई; जाणून घ्या वाहतूक बदल

ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे काय?

ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट संकल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मिळवलेले सर्व श्रेयांक ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या आभासी बँकेत साठवले जातील. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम, महाविद्यालय, विद्यापीठ बदलले तरी त्यांनी मिळवलेले श्रेयांक या बँकेत कायमस्वरुपी उपलब्ध असतील. त्यामुळे संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण पडण्यास मदत होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra leads in student registration on academic bank of credit website pune print news ccp 14 ssb

First published on: 06-10-2023 at 13:53 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा