मराठा क्रांती सेनेचा इशारा

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्र क्रांती सेनेला सन्मानाने योग्य जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. घटक पक्ष या नात्याने युतीकडे दहा जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, वाटाघाटीत या जागा न मिळाल्यास स्वबळावर शंभर जागांवर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र क्रांती सेनेतर्फे रविवारी करण्यात आली.

मराठा समन्वय समिती आणि विविध सत्तावीस संघटनांची बैठक रविवारी पुण्यात झाली. या बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षासमवेत युती न करण्याचा तसेच मराठा आरक्षण आंदोलनातून तयार झालेले मराठा नेतृत्व विधानसभेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाजप-शिवसेना युतीकडे दहा जागांची मागणी करण्याचा आणि युतीने या जागा सोडल्या नाहीत, तर स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र क्रांती सेनेचे समन्वयक सुरेश पाटील यांनी दिली. विविध ४२ संघटनांनी महाराष्ट्र क्रांती सेनेला पाठिंबा दिला असल्याचा दावा या वेळी करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र क्रांती सेनेने १५ उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लेखी पत्र देऊन युतीचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्र क्रांती सेनेला मान्यता दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

निवडणूक लढविण्याच्या भूमिकेशी मराठा महासंघाचा संबंध नाही

महाराष्ट्र क्रांती सेनेच्या विधानसभा निवडणूक लढविण्याबाबतच्या भूमिकेशी अखिल भारतीय मराठा महासंघाचा संबंध नाही, असे मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी स्पष्ट केले आहे. काही संघटनांनी महाराष्ट्र क्रांती सेनेला पाठिंबा दिलेला नसतानाही ओढूनताणून त्यांची नावे घुसडण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांनी त्या जरूर लढवाव्यात. मराठा महासंघाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. महासंघाचा महाराष्ट्र क्रांती सेना या संघटनेशी वा पक्षाशी कोणताही संबंध नाही, असेही कोंढरे यांनी म्हटले आहे.