घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांच्या थकबाकी वसुलीची मोहीम राबवितानाच ‘महावितरण’ने आता कृषिपंप थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला आहे. थकबाकी असलेल्या पुणे विभागातील कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पुणे परिमंडलातील राजगुरूनगर, मुळशी व मंचर विभागातील ५९ हजार ७८१ कृषिपंपधारकांकडे ४२ कोटी ९८ लाख रुपयांची थकबाकी आहे. मोहिमेमध्ये आतापर्यंत आठ हजार तीन कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मोहीम राबविण्यात येत असल्याने आठ हजार ६७६ थकबाकीदार शेतकऱ्यांनी तीन कोटी ८६ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
ग्राहकांच्या दारामध्ये वीज नेण्यासाठी प्रतियुनिट पाच रुपये ५६ पैशांचा खर्च येतो. अशा परिस्थितीत कृषिपंपांना प्रतियुनिट एक रुपयापेक्षाही कमी दराने वीज देण्यात येते. त्यामुळे यापुढे कृषिपंपांची थकबाकी वाढू न देण्याची भूमिका ‘महावितरण’ने व्यापक पातळीवर घेतली आहे. त्यानुसार एप्रिल २०१२ ते जून २०१३ या कालावधीतील कृषिपंपांची विजबिले पूर्णत: वसूल करण्याची मोहीम राज्यभर सुरू करण्यात आली आहे.
मंचर, राजगुरुनगर, मुळशी या विभागामध्ये ९३ हजार ३४८ कृषिपंपधारक आहेत. त्यातील ५९ हजार ७८१ कृषिपंपधारकांकडे ४२ कोटी ९८ लाख रुपयांच्या वीजबिलाची थकबाकी आहे. मुळशी विभागात १२ हजार २७ शेतकऱ्यांकडे सहा कोटी ६० लाख रुपये, राजगुरूनगर विभागात १३ हजार ५९९ शेतकऱ्यांकडे १३ कोटी ४ लाख व मंचर विभागातील ३४ हजार १५५ शेतकऱ्यांकडे २३ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. मोहिमेमध्ये थकबाकी असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तातडीने बिलाचा भरणा करावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘महावितरण’चा आता कृषिपंप वीजबिल थकबाकीदारांना ‘शॉक’
कृषिपंपांना प्रतियुनिट एक रुपयापेक्षाही कमी दराने वीज देण्यात येते. त्यामुळे यापुढे कृषिपंपांची थकबाकी वाढू न देण्याची भूमिका ‘महावितरण’ने व्यापक पातळीवर घेतली आहे.
First published on: 10-09-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitarans new target to collect arrears from agri pumpholders