विवाहासाठी दागिने खरेदीच्या बतावणीने सराफ व्यावसायिकाकडून ४ लाख ८० हजारांचे दागिने खरेदी करून पसार झालेल्या भामटय़ाला विश्रामबाग पोलिसांनी पकडले.
राजेंद्रकुमार स्वरूपराव गुरुढाळकर (वय २७, सध्या रा. संजय पार्क, लोहगांव, मूळ रा.एकोडी रोड, उमरगा) असे अटक करण्यात आलेल्या भामटय़ाचे नाव आहे. लक्ष्मी रस्त्यावरील सराफ व्यावसायिक प्रसाद नगरकर यांच्याकडे आरोपी गुरुढाळकर व त्याची पत्नी पूनम दागिने खरेदीच्या बहाण्याने आले होते. विवाहासाठी एक कोटी रुपयांचे दागिने खरेदी करायचे आहेत, अशी बतावणी गुरुढाळकर याने केली होती.
नगरकर यांचा विश्वास संपादन करून त्याने धनादेश दिला आणि सुरुवातीला त्यांच्याकडून तेरा तोळे दागिने खरेदी केले. नगरकर यांनी त्याने दिलेल्या धनादेश बँकेत भरला. मात्र, गुरुढाळकर याच्या खात्यात पैसे नसल्यामुळे तो वटला नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. गुरुढाळकर बंडगार्डन रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे सापळा लावून त्याला पकडण्यात आले. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत भट, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील पिंजण, सहायक निरीक्षक महेंद्र पाटील, शरद वाकसे, बाबा दांगडे, संजय बनसोडे, मोहिते यांनी ही कारवाई केली.